Maharashtra Rain Updates मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे सखलभाग जलमय झाले आणि त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचा फटका सोमवारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बसला. माटुंगा, वडाळा, दादर टीटी, भोईवाडा, जुहू गल्ली, वकोला, अंधेरी, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे.

मुंबईत रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गावर परिणाम झाला. पूर्व मुक्त मार्गावरील दक्षिण वाहिनीवरीलही वाहतूक संथगतीने सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. मलबार हिल परिसरातील नारायण दाभोळकर मार्गावरही पाणी भरल्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. याशिवाय परळ येथील एल्फिन्स्टन पुलावरही पाणी साचल्याने तेथील वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, दक्षिणेकडे जाणाऱ्या सिबा मार्ग येथील वाहतूक संथगतीने सुरू आहे. अंधेरी मार्केट,. जे. जे पुल येथील वाहतुकीची गती मंदावली होती. असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. वरळी नाका उत्तर वाहिनी, वांद्रे बँड स्टँड, जे.जे. मार्ग, हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, वाकोला राम नगर सबवे येथे पाणी साठले आहे. त्यामुळे या परिसरात जोडणाऱ्या मार्गिकांवरील वाहतुक संथ गतीने सुरू आहे. माटुंगा गांधी मार्केट येथे दीड फूट पाणी साचले होते, हिंदमाता येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

याशिवाय पश्चिम उपनगरातील अंधेरी बर्फीवाला रोड डीएन रोड येथे एक फूट पाणी साचले आहे. वाकोला पुलावरील पानबाई स्कूल येथील जंक्शन परिसरात एक फूट पाणी साचले असून खार सबवे येथेही पाणी साचले आहे. अंधेरी सबवे येथे दोन ते अडीच फूट पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक गोखले पुल व ठाकरे पुलाच्या मार्गाने वळवण्यात आली आहे.

मुंबईत मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात कमी वेळात अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता देखील आहे.. पावसाचे प्रमाण पुढील काही तासांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

खड्डे आणि अपघात

दादर, किंग सर्कल येथील उड्डाण पुलावर टॅक्सी उलटली होती. तिचाही वाहतुकीवर परिणाम झाला. दहिसर येथे ट्रेलर अपघातामुळे उत्तर वाहिनीवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. विक्रोळी येथील कन्नमवार पुलावर ट्रक बिघडल्यामुळे दक्षिण वाहिनीवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.