मुंबई : प्रवाशांना गारेगार प्रवास घडविच्या उद्देशाने पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आल्या. परंतु, वातानुकूलित लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बिघडल्याने थंड हवा न येणे किंवा लोकलचे दरवाजे बंद होत नसल्याने प्रवासात खोळंबा होणे अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. वातानुकूलित लोकलमुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होते. भविष्यात मोठ्या संख्येने वातानुकूलित लोकल धावल्यास प्रवाशांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड होत असल्याने, प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. तसेच वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याने वातानुकूलित यंत्रणा कुचकामी ठरते. तसेच काही वेळा तांत्रिक बिघाडामुळे, तर काही वेळा प्रवाशांच्या गर्दीमुळे लोकलचे दरवाजे बंद होत नाहीत. लोकलचे दरवाजे बंद करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला पाचारण करावे लागते. प्रवाशांना वातानुकूलित लोकलमधून उतरवून दरवाजे बंद करावे लागतात. यामुळे बहुतांश लोकलचा वक्तशीरपणा बिघडतो. त्यामुळे प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागतात.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. दररोज लोकलमधून एक ते दोन प्रवासी पडतात. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता अधिकाधिक वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वातानुकूलित लोकल सेवेत आणताना जादा तिकीट दराचा भार प्रवाशांवर पडू नये यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वातानुकूलित लोकलला स्वयंचलित दरवाजे असल्याने लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे अपघात टाळता येईल. परंतु, गर्दीच्या लोंढ्यामुळे दरवाजे बंद न झाल्यास त्यासाठी सुरक्षा व्यवस्थेला वारंवार पाचारण करावे लागेल. तसेच यामुळे सर्वच लोकलचा वक्तशीरपणा कमी होईल. त्यामुळे वातानुकूलित लोकल वाढविताना रेल्वे मार्गिका वाढवणे आवश्यक आहे. यासह मुंबईतील रखडलेले रेल्वे प्रकल्प पूर्ण करून नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू कराव्यात, असे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले.
मध्य रेल्वेवर एक अतिरिक्त वातानुकूलित रेक दाखल झाला आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलमध्ये थंड हवा न येण्याची समस्या दूर झाली आहे. मेट्रोमध्ये प्रवासी शिस्तबद्ध पद्धतीने चढतात. तसेच मेट्रोमध्ये गर्दी झाल्यास प्रवासी दुसरी मेट्रो येण्याची वाट पाहतात. तसेच वातानुकूलित लोकलसाठी प्रवाशांनी पुढाकार घेऊन स्वतःसह इतर प्रवाशांचा विचार करणे आवश्यक आहे. गर्दी असलेल्या वातानुकूलित लोकलमध्ये चढल्यास तिचे दरवाजे बंद होत नाहीत. त्यामुळे त्या लोकलसह तिच्या मागील इतर लोकलवर परिणाम होतो. त्यामुळे गर्दी असलेल्या लोकलमध्ये प्रवाशांनी चढू नये.
डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून दररोज १.४० लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. तसेच, नोव्हेंबर २०२४ पासून १०९ वातानुकूलित लोकल धावत आहेत. येत्या काळात प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित सेवा पुरविण्यासाठी वातानुकूलित लोकलच्या संख्येत वाढ केली जाईल.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.विनित अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
- देशातील पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ रोजी धावली.
- मध्य रेल्वेने जानेवारी २०२० रोजी ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे – पनवेलदरम्यान पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली.
- मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी – कल्याण मार्गावर दुसरी वातानुकूलित लोकल चालविण्यास सुरूवात केली.
- पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. तर, पश्चिम रेल्वेवर ८ डब्यांच्या दररोज १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात.
- मध्य रेल्वेवरून दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावतात. तर, मध्य रेल्वेवर ७ डब्यांच्या दररोज ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात.