मुंबई: पूर्वमूक्त मार्ग विस्तारीकरणाच्या कामासाठी विक्रोळी ते ठाणेदरम्यान ७०६ झाडे बाधित होणार आहेत. यातील काही झाडे कापली जाणार असून काही झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. पण या झाडांच्या कत्तलीसह पुनर्रोपनाला पर्यावरणप्रेमींनतर आता राजकीय पक्षांनी आणि द्रुतगती मार्गावरील बाधित झाडे लावत त्यांची देखभाल करणार्या ग्रीन सॅज फाऊंडेशनने जोरदार विरोध केला आहे. ही झाडे आम्ही लावली असून त्यांची मुलांप्रमाणे काळजी घेतली आहे. या झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जात आहे. त्यामुळे या झाडांची कत्तल करुन नये,विस्तारीत ठाणे ते घाटकोपर मार्गाचे संरेखन बदलावी अशी मागणी ग्रीन सॅज फाऊंडेशनने केली आहे. या मागणीसाठी फाऊंडेशनकडून चिपको आंदोलन करण्यात येणार आहे.
घाटकोपर ते ठाणे प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) घाटकोपर ते ठाणे असा पूर्वमूक्त मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. या विस्तारीकरणाच्या कामात पूर्व द्रुतगती मार्गावरील ७०६ बाधित होणार आहेत. यातील ३२० झाडे कापली जाणार असून ३८६ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहे. या झाडांच्या कत्तलीसह पुनर्रोपनाला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. अॅड सागर देवरे यांनी तर एमएमआरडीए महानगर आयुक्त आणि मुंबई महानगर पालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावत वृक्षतोडीला विरोध करत संरेखन बदलण्याची मागणी केली आहे. तर आता शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोध केला आहे. खासदार संजय दीना पाटील यांनी या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्हास होणार असल्याचे म्हणत वृक्षतोडीचा निर्णय रद्द करण्याची मागणी एमएमआरडीए आणि पालिकेकडे केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आता पूर्व द्रुतगती मार्गावर जी झाडे बाधित होत आहेत त्यापैकी अधिकाधिक झाडे ज्या संस्थेने लावली आहेत त्या ग्रीन सॅज फाऊंडेशन संस्थेनेही आता या वृक्षतोडीला विरोध केला आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावर २०१९ पासून आमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून झाडे लावली आहेत, लावत आहोत. दर रविवारी आम्ही झाडे लावतो, झाडांची काळजी घेतो, स्वखर्चातून आम्ही हे सर्व करतो. यावेळी पर्यावरणाचे संतुलन राखणे हेच उद्दिष्ट आमचे आहे. असे असताना आम्ही मुलांप्रमाणे जपलेल्या झाडांच्या कापण्याचा डाव विकासाच्या नावाखाली आखला जात असेल तर तो डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचा या वृक्षतोडीला, पुनर्रोपनला विरोध आहे आणि असेल असे ग्रीन सॅज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड जितेंद्र राठोड यांनी सांगितले. एमएमआरडीएने विस्तारीत मार्गाचे संरेखन बदलावे आणि झाडे वाचवावित अशी मागणी राठोड यांनी केली आहे. तर या मागणीसाठी लवकरच पूर्व द्रुतगती मार्गावर चिपको आंदोलन केले जाणार असल्याचेही सांगितले.
कदंब, काटेसावर, चिंच, आवळा, साग, अर्जुन, बकुळ, तिवर, पळस, मोह, बुच, वड, पिंपळ यासारख्या अनेक देशी प्रजाती आम्ही येथे लावल्या आहेत. ही सर्व झाडे पर्यावरणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. तर काही झाडांचे पुनर्रोपन केले जाणार असल्याचे सांगितले जाते. मात्र पुनर्रोपन यशस्वी होण्याचा दर अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे ही झाडे वाचविण्यासाठी संरेखन बदलावे ही आमची मागणी असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
