मुंबई : राज्य सरकारने ॲप आधारित वाहनांवर कडक कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानुसार, शुक्रवारपासूनच उबर शटल, सिटी फ्लो आणि इतर ॲप आधारित वाहनांवर परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उबर शटल सेवा शनिवारी बंद झाली. तसेच इतर ॲप आधारित वाहने बंद झाल्याने प्रवाशांना इतर पर्याय शोधावे लागले.
राज्यातील ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ॲप आधारित वाहनांनी योग्य परवाने घेतलेले नाहीत. असे असतानाही ही वाहने बेकायदेशीरपणे धावत आहेत. अशा अनधिकृत सेवांवर कारवाई करण्याच्या सूचना सरनाईक यांनी आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्या मुंबई महानगर प्रदेशात उबर शटल, सिटी फ्लो आणि इतर ॲप आधारित ऑपरेटर्सकडून सुमारे ४५० बस चालवल्या जातात. मात्र, परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने, शुक्रवारपासून ॲप आधारित वाहनांची संख्या कमी झाली. तर, उबर शटल सेवा शनिवारी पूर्णपणे बंद झाली. तर, सिटी फ्लो बस काही प्रमाणात दिसल्या. दरम्यान, उबर ॲपवरून उबर शटल सेवेचा पर्याय बंद करण्यात आला आहे, अशी माहिती उबरच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली.
बेस्ट बसच्या अपुऱ्या सेवा आणि रेल्वेच्या गर्दीमय प्रवासापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रवासी ॲग्रीगेटर बसला पसंती देत आहेत. परंतु, या बस सेवेवर शुक्रवारपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली. परिणामी, बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांचा हाल होत असून चालकांचा रोजगार बुडाला आहे. – विनय सिंग, बस मालक.
मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ मधील तरतुदीनुसार, केंद्र शासनाच्या मोटार वाहन ॲग्रीगेटर नियमावली २०२० नुसार ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. उबर (शटल), सिटी फ्लो व ओला ॲपच्या माध्यमातून असा कुठलाही परवाना न घेता बेकायदेशीरपणे बसेसद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. तसेच परिवहन विभागाला याबाबतीत वारंवार तक्रारी प्राप्त झाल्याने, ॲग्रीगेटर नियमावली २०२० मधील तरतुदींचा भंग करणाऱ्या बसवर मोटार वाहन कायद्यामधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत आहे.
मुंबई पूर्व, पश्चिम आणि मध्य, ठाणे, वसई, बोरिवली, पनवेल येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कल्याण, नवी मुंबई येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाचे सह परिवहन आयुक्त (अंमल -२) रवी गायकवाड यांनी दिले आहेत.
गेल्यावर्षीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर उबर शटल सेवा सुरू झाली. तसेच सिटी फ्लोची सेवा सुरू आहे. परंतु, बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे आढळल्यानंतर राज्य परिवहन विभागाने शनिवारपासून उबर शटल कंपनीच्या प्रीमियम बसवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही बस सेवा बंद करण्यात आली. उबर शटल बसेसच्या कमतरतेमुळे सोमवारपासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, भाईंदर येथून वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी, दक्षिण मुंबई आणि मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरांत जाणाऱ्या नोकरदारांचे हाल होण्याची शक्यता आहे.