मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गतच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांसाठी https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. ‘आयडॉल’च्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित सर्व तपशील आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

यंदा ‘आयडॉल’मध्ये पहिल्यांदाच पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात येत आहे. तसेच पहिल्यांदाच ‘एम. ए. समाजशास्त्र’ हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येत आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

‘आयडॉल’तर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक उपलब्ध आहेत. नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी ‘आयडॉल’चे माध्यम सोयीस्कर ठरत आहे.