मुंबई : मुंबई विद्यापीठाने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घेऊन अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापना केली असून सदर केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते बुधवार, १६ जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात हे अद्ययावत सोयी-सुविधायुक्त आणि प्रगत तंत्रज्ञानाचे केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आधीच रोगांचे निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करून समग्र आरोग्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी या केंद्राचे महत्व अधोरेखीत होणार आहे. तसेच महिलांच्या आरोग्यासंबंधित समस्या दूर करण्यासाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त भारत’ या प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुनिलकुमार बर्णवाल, अतिरिक्त सचिव, उच्च शिक्षण भारत सरकार (आभासी पद्धतीने), टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण प्रकल्पाला ‘पीएम-उषा’ योजनेचेही पाठबळ लाभले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रातर्फे सुरुवातीला दोन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये पीसीओएस आणि स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) यांचा समावेश आहे. पीसीओएसच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी प्रमुख ‘एआय मॉडेल्स’ना या स्थितीच्या महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर प्रशिक्षित करण्यात आले.
यामध्ये सध्याच्या तुलनात्मक अभ्यासात ९० टक्के अचूकता दिसून आली. तर दुसरीकडे, स्तनाच्या कर्करोगाच्या मॅमोग्राफिक प्रतिमांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांची चाचणी घेण्यासाठी डीप लर्निंग मॉडेल्सचा वापर करण्यात आला, ज्यामध्ये लहान पूर्वलक्षी डेटासेटवर ९७ टक्के अचूकता प्राप्त झाली आहे. याचे नामांकित रुग्णालयांचे संचालक आणि अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले.
या सादरीकरणादरम्यान टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी या क्षेत्रांतील निदानांच्या डोमेन आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने आघाडी घेऊन प्रगत संशोधन करावे यासाठी सर्वोतोपरी सहाय्य केले जाणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. तर डॉ. सुनील कुमार बर्णवाल यांनी मुंबई विद्यापीठाचे कौतुक करीत कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राच्या प्रकल्पाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयालाही सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टरांना रोगांचे निदान करताना सहाय्यक प्रणाली म्हणून उपयुक्त अशी प्रणाली विकसित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. तसेच नजीकच्या काळात एआय मिशनशी निगडीत शिक्षण, पायाभूत सुविधा आणि शेती या क्षेत्रातही महत्वपूर्ण विदा संकलन, विश्लेषण व निष्कर्ष काढून संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि भविष्यकालीन उपाययोजना करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून काम केले जाणार आहे.