मुंबई : ऑन-द-जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप आणि औद्योगिक संलग्नता यांना उच्च शिक्षणाशी जोडण्याच्या विद्यापीठाच्या व्यापक दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठाच्या ई-समर्थ संकेतस्थळावर ‘प्लेसमेंट आणि ट्रेनिंग’ हे नवीन मॉड्यूल सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये नोंदणीकृत असलेले विद्यार्थी आता या संकेतस्थळाद्वारे इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी सहजपणे शोधू शकतील.
तसेच सार्वजनिक, खासगी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्था व औद्योगिक आस्थापना विद्यापीठातील होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या आस्थापनांना लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज नोंदवू शकतील. मुंबई विद्यापीठाने नव्याने सुरु केलेले हे माध्यम विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योग क्षेत्रासाठी एक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम व्यासपीठ म्हणून उपलब्ध होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलने (सीटीपीसी) या मॉड्यूलसाठी पुढाकार घेतला आहे. विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, संचालक, प्लेसमेंट समन्वयक आणि उद्योग क्षेत्राशी वेळोवेळी समन्वय साधून या प्रारूपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सीटीपीसी प्रयत्नशील राहणार आहे. मुंबई विद्यापीठामार्फत गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ मिळविण्यास इच्छुक असलेल्या संस्था या पोर्टलवर नोंदणी करून आपल्या गरजा नोंदवून शैक्षणिक-औद्योगिक सहयोगाच्या व्यासपीठाचा भाग होऊ शकतील. ई-समर्थ प्रणालीच्या https://mu.samarth.ac.in/index.php/training/company-profile-requests/register या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी सार्वजनिक व खासगी, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देत आहेत. हे नवीन मॉड्यूल विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचे प्रत्यक्ष क्षेत्रात रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच हे मॉड्यूल केवळ प्लेसमेंटसाठीचे माध्यम नसून शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील दुवा मजबूत करण्याचे साधन आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि उद्योगांना भारतातील अत्यंत सशक्त व बुद्धिमान प्रतिभा लाभावी, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.