मुंबई : भारताच्या समृद्ध आणि ऐतिहासिक परंपरेतील दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई विद्यापीत्तील विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी २६ हून अधिक देशांच्या वाणिज्यदूतांनी आणि ६१ हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांनी दीपोत्सव अनुभवण्यासह भारतीय व्यंजन व फराळाचा आस्वाद घेतला. तर परदेशी विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना पीएच.डी. संशोधनासाठी दालने खुली करण्यात येणार असून सर्व संबंधित प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल. आजमितीस दुहेरी, सह आणि ट्विनिंग पदवी अभ्यासक्रमांसह विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी जागतिक स्तरावरील नामांकित विविध २३ उच्च शिक्षण संस्थांशी मुंबई विद्यापीठाने करार केले आहेत. उद्योन्मुख क्षेत्राकडे झेप घेण्यासाठी विद्यापीठ नियोजन करीत असल्याचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृहात ९ ऑक्टोबर २०२५ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह अर्जेंटिना, बेलारूस, ब्राझील, चिली, चीन, फ्रान्स, चेक रिपब्लिक, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, इटली, जपान, मॉरिशस, मेक्सिको, ओमान, पनामा, नॉर्वे, रशिया, श्रीलंका, थायलंड, टर्की, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि येमेन आदी विविध देशांचे वाणिज्यदूत आणि मुंबई विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ असलेले ६१ हून अधिक परदेशी विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

याप्रसंगी डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी उपस्थित विविध देशांच्या वाणिज्यदूतांना दीपोत्सवाच्या शुभेच्छा देऊन भारताच्या समृद्ध आणि ऐतिहासिक परंपरेतील दिवाळीचे महत्त्व सांगितले. तसेच दिवाळीसंध्या कार्यक्रमात विद्यार्थी विकास विभागामार्फत सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्याद्वारे गणेश वंदना, दिवाळी गाणी, होजागिरी, नाटी आणि पंथी ही लोकनृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्यासह सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे आणि विद्यार्थी विकास विभागातील जिल्हा समन्वयक व कर्मचाऱ्यांनी केले. तर डॉ. नीतिन आरेकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.