मुंबई : वाकोल्यात एका इसमाने घरात झालेल्या भांडणादरम्यान पत्नी आणि मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सांताक्रूझच्या वाकोला येथे गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. हल्ल्यानंतर फरार झालेल्या पतीचा शोध सुरू आहे.

वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुलेमान हुजरा (४१) पत्नी नसिमा आणि मुलगी आशागरी (१५) सोबत वाकोला येथील शिवनगर परिसरात रहात होता. तो रंगारी असून त्याची पत्नी नसीमा मजूर म्हणून काम करते. पती – पत्नी मध्ये सतत आर्थिक गोष्टींवर वाद होत होते.

सुलेमान आणि नसिमा यांच्यात गुरुवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात सुलेमानने पत्नी आणि मुलीवर घरातील चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघी गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. दोघांना तेथेच टाकून सुलेमान पसार झाला.

मुलीचा मृत्यू, पत्नीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज

याबाबत शेजाऱ्यांनी वाकोला पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी नसीमा आणि मुलगी आशागरी यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र आशागरीचा मृ्त्यू झाला, तर नसीमची प्रकृती चिंताजनक आहे.

हल्लेखोर पतीचा शोध सुरू

याप्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी सुलेमान हुजरा याच्याविरोधात हत्याचे गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक हिंसाचारात वाढ

मुंबईत सातत्याने कौटुंबित हिंसारात वाढ होत आहे. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाच्या (एनसीआरबी) ताज्या अहलावानुसार २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये ४८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.