मुंबई : IMD Weather Update Today मुंबईत सध्या अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. याचबरोबर राज्यातही पावासाचा जोर काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहर तसेच उपनगरात शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबईत मागील आठवड्यात पावसाचा जोर होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. आता पुन्हा एकदा मुंबईत पाऊस जोर धरणार आहे. ओडिशाकडील कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकणार असल्याने याचाच परिणाम म्हणून आजपासून पाऊस हळूहळू वाढण्यास सुरुवात होईल. आजपासून प्रामुख्याने शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवार सायंकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रविवारनंतर पावसाचा जोर ओसरेल.

कमी दाबाचा पट्टा

उत्तर छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेरपासून, कोटा, नर्मदापूरम, सेवोनी, दुर्ग, चांदबली ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचा पट्टा आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यात काही भागात विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता आहे.

आज पावसाचा अंदाज कुठे

अति मुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट)

ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक, पुणे घाट परिसर

मुसळधार पाऊस (येलो अलर्ट)

मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक , सातारा , कोल्हापूर</p>

विजांसह पाऊस

मराठवाडा

हलक्या सरी

विदर्भ

सप्टेंबरमध्ये १०९ टक्के पाऊस

सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, देशात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर कोकणात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पूर्वोत्तर राज्य, पूर्व भारताचा काही भाग, दक्षिण द्वीपकल्पाचा बहुतांश भाग आणि देशाच्या उत्तरेत असलेल्या जम्मू- काश्मीर, लडाख वगळता देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

ला-निना स्थिती

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सध्या सर्वसाधारण स्थिती (एन्सो न्यूट्रल) आहे. मान्सून हंगाम अखेरच्या टप्प्यात येताच प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून आणि हिवाळ्यात ‘ला-निना’चा प्रभाव राहू शकेल. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सर्वसाधारण पातळीवर असून, मान्सून अखेरीस ‘आयओडी’ ऋण (निगेटिव्ह) होण्याचा अंदाज आहे.