मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरार, वांद्रे येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून दोन तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडले.
विरार येथे सोमवारी सकाळी १०.४५ वाजता पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा खोळंबली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचून त्यांनी दुरुस्तीची कामे हाती घेतली. त्यानंतर तब्बल सकाळी ११.४० वाजता पॉईंटमधील बिघाड दुरुस्त करण्यात पश्चिम रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले. सुमारे एका तास पश्चिम रेल्वेवरील लोकल उशिराने धावल्या. तसेच अनेक गाड्या रद्द झाल्या. या घटनेमुळे विस्कळीत झालेले वेळापत्रक पूर्वपदावर येत असताना दुपारी १.४५ वाजता वांद्रे येथे पॉइंटमध्ये बिघाड झाला.
वांद्रे येथील हार्बर मार्गावर अप आणि डाऊन लोकल सेवा कोलमडली. या घटनेनंतर लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावू लागली. पॉइंट बिघाड दुरूस्त करण्यासाठी, पश्चिम रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेतले. दुपारी २.१४ वाजता दुरूस्ती करण्यात आली. परंतु, लोकल वेळापत्रक पूर्वपदावर आले नाही. सायंकाळी चर्चगेटवरून डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल १० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे परतीचा प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला पश्चिम रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागले.
एकाच दिवशी दोन तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा खोळंबली. पश्चिम रेल्वे दर आठवड्याला ब्लॉक घेते. परंतु, या ब्लॉकमध्ये कामे करून देखील, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बिघाड होतो, ही खूप गंभीर बाब आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने, लोकल खोळंबतात. त्यामुळे नोकरदार वर्गाचा प्रवास उशिरा होतो, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
सोमवारी सायंकाळी ५.०७ वाजेच्यादरम्यान वाशी स्थानकाजवळ पनवेल-वडाळा लोकलच्या छतावर एक व्यक्ती चढली होती. त्यामुळे सायंकाळी ५.२१ वाजेपर्यंत सर्व लोकल सेवा थांबवून, ओएचई वायरचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. यादरम्यान, त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. सुमारे १० ते १५ मिनिटांचा खोळंबा झाल्याने, हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. हार्बर मार्गावरील सीएसएमटीवरून पनवेलकडे जाणारी आणि पनवेलवरून सीएसएमटीकडे येणारी अप आणि डाऊन लोकल सेवा विलंबाने धावली. त्यामुळे कार्यालयातून घरची वाट धरलेल्या प्रवाशांचे हाल झाले.