मुंबई: कुटुंबियांसोबत दिवाळीच्या खरेदीसाठी निघालेल्या ३२ वर्षीय महिलेचा मंगळवारी चेंबूर येथे टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. याबाबत आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून टँकर चालकाला अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अंजली सोनी (३२) असे मृत महिलेचे नाव असून त्या चेंबूरच्या वाशीनाका परिसरात कुटुंबियांसोबत राहत होत्या. अंजली सोनी यांच्या पतीचा याच परिसरात दुधाचा व्यवसाय असून मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास दोन मुले आणि पत्नीला घेऊन ते दुचाकीवरून बाजारात खरेदीसाठी जात होते. चेंबूरमधील रायन शाळे समोरून जात असताना त्यांच्या दुचाकी समोर अचानक एक रिक्षा आली. यावेळी अंजली यांच्या पतीने दुचाकीचा ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी घसरली आणि चौघेही दुचाकीवरून खाली पडले. यावेळी पाठीमागून आलेल्या टँकरखाली अंजली चिरडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी टँकर चालक शिवम सिंगविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.