मुंबई : व्हीजेटीआयमधून अभियांत्रिकीची पदवी, आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमबीए) खासगी क्षेत्रातील वाटचालीसाठी खणखणीत म्हणावी अशी पात्रता असूनही प्रियंवदा म्हाडदळकरला प्रशासकीय सेवेने खुणावले. मुंबईच्या प्रियंवदाला केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या लोकसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत तेरावे स्थान मिळाले आहे.

प्रियंवदाने मुंबईच्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी देशातील अव्वल मानल्या जाणाऱ्या आयआयएमपैकी बंगळुरु आयआयएममधून तिने व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमबीए) घेतली. दरम्यान विद्यार्थी आदान प्रदान योजनेमधून जर्मनीतील विद्यापीठातही काही महिने शिक्षण घेतले.

इन्व्हेस्टमेंट बँकिंगसारखा खासगी क्षेत्रात मागणी असलेला विषय असूनही शासकीय सेवेत येण्याचे तिने ठरवले. घेतलेले शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी काही काळ नोकरी केल्यानंतर तिने लोकसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यासाठी जुलै २०२० मध्ये नोकरी सोडली; त्याचवर्षी परीक्षेचा अर्जही भरला. मात्र पुरेशी तयारी न झाल्याने परीक्षा दिली नाही.

गेल्यावर्षी (२०२१) पुन्हा अर्ज भरला आणि देशातील अव्वल उमेदवारांमध्ये स्थान पटकावले. परीक्षेच्या तयारीसाठी वैकल्पिक विषयासाठी ऑनलाइन शिकवणीचा आधार घेतला. मात्र बाकी पूर्णपणे स्वयंअध्ययन केल्याचे प्रियंवदाने सांगितले.

हेही वाचा : ‘युपीएससी’ परीक्षेत उपराजधानीतील विद्यार्थ्यांचा झेंडा, तीन उमेदवारांनी मारली बाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडील शासकीय सेवेत असल्याने प्रशासकीय सेवेबाबत उत्सुकता होती. फक्त नोकरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा व्यवस्थेसाठी, समाजासाठी उपयोग करण्याची इच्छा होती. मात्र, बाकीही क्षेत्र खुणावत होती. एमबीए केल्यावर परीक्षेच्या तयारीसाठी वेळ देऊ शकू असा आत्मविश्वास आला. त्यानंतर पूर्णवेळ परीक्षेची तयारी सुरू केली, असे प्रियंवदाने सांगितले.