द लिव्हिंग स्टॅच्यु किंवा गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरजेश गौड या स्ट्रिट आर्टिस्टला वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड येथे मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गिरजेश गौड याने यासंदर्भातील व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. बॅण्ड स्टॅण्डवर झालेल्या या घटनेबाबत त्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे माहिती दिली.

हेही वाचा >> शिवाजी पार्कात कोणाचा दसरा मेळावा होणार? शंभूराज देसाई म्हणाले, “आजपर्यंत जसं…”

“हा व्हिडिओ काल रात्री ८ च्या सुमारास वांद्रे बॅंडस्टँडवर शूट करण्यात आला आहे. हा मद्यधुंद पोलीस हवालदार माझ्याकडे आला आणि त्याने त्याच्या लाठीने माझ्यावर हल्ला केला. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मला का मारतोय असे विचारले तर त्याने माझ्यावर शिवीगाळ केली. नंतर सर्व लोकांसमोर त्याने माझी मान दाबून धरली आणि मला खेचू लागला. त्यामुळे माझा श्वास रोखला गेला. मला पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्याने दिली. मी एक कलाकार असून मुंबईत माझं कोणीच नाही. Instagram (चाहते) कुटुंबाशिवाय मला कोणीही नाही. मी एकमेव आर्टिस्ट नसून मुंबईत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह अशा स्ट्रिट आर्टवर चालतो. आम्ही आमच्या हक्कांबाबत पोलिसांशी बोललो तर आम्ही गुन्हा केल्याप्रमाणे वागवलं जातं. तुम्हीच आता सांगा आम्ही काय करायला हवं? आम्हाला पाठिंबा द्या आणि हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा”, असं त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

स्ट्रिट आर्टिस्ट गिरजेश गौड याने सांगितल्यानुसार पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस कर्मचाऱ्याने गोल्डन मॅनशी हुज्जत घालायला सुरुवात केली तेव्हा जमलेल्या मुंबईकरांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. आपली कला सादर करणाऱ्या कलाकाराला अडवणाऱ्या पोलिसाविरोधात मुंबईकरांनी एकजूट दाखवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे पोलीस खात्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. गोल्डन मॅनने अल्पावधीत प्रसिद्ध मिळवली आहे. तो अंगभर सोन्याचा रंग लावून स्तब्ध उभा राहतो. डोळ्यांची पापणीही न हलवता तो दिर्घकाळ एकाच ठिकाणी उभा राहत असल्याने त्याच्या कलेचं कौतुक केलं जातं.