मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. घटनेच्या वेळी लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींनी या समितीला सहकार्य करावे आणि घटनेची माहिती द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. यामुळे समितीला दुर्घटनेचा तपास करण्यात मदत होईल.
मुंब्रा घटनेविषयी किंवा त्यासंदर्भात कोणतीही माहिती, तपशील असल्यास लवकरात लवकर चौकशी समितीसमोर उपस्थित राहावे आणि माहिती द्यावी. तसेच कार्यालयाच्या पत्त्यावर, मोबाइल क्रमांकावर किंवा ई-मेलवर तीन कामकाजाच्या दिवसात पाठवावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच माहितीसोबत ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. घटनेची माहिती एस. एस. सोनवणे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय, मुंबई विभाग, मध्य रेल्वे, ॲनेक्स इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पाठवावी. तसेच मोबाइल क्रमांक ८८२८११९७३० वर किंवा srdsobbcr@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधून माहिती देता येईल.