मुंबई: बॉलिवूडचे अस्तित्व मुंबईत टिकून राहावे आणि चित्रपटांचे चित्रीकरण सहजपणे करता यावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.निसर्गसौंदर्यांनी नटलेले तलाव, शाळा, रुग्णालये, कचरा क्षेपणभूमी अशा ठिकाणी कोणत्याही परवानगीविना चित्रिकरण करता यावे, यासाठी महानगरपालिका धोरण तयार करणार आहे. तसेच चित्रीकरणासाठी आणखी जागाही निवडल्या जाणार आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे व्यवसाय विकास विभाग आणि मुंबई-युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबईतील चित्रपट क्षेत्राबाबत भागधारकांशी विचारविनिमय’ या विषयावर वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स इन येथे विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही घोषणा केली.

मुंबईतील प्रेक्षणीयस्थळी परवानगी

हिंदी चित्रपटांचे माहेरघर म्हणून मुंबईची जागतिक ओळख आहे. चित्रपट व्यवसाय क्षेत्र (फिल्म इंडस्ट्री) हा मुंबईच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. मुंबईतील मनोरंजन क्षेत्राला उत्तमोत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटीबद्ध आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत निसर्गसौंदर्यांनी नटलेले तलाव, शाळा, रुग्णालये, कचरा क्षेपणभूमी आदी आस्थापना आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही परवानगीविना चित्रिकरण करता यावे, यासाठी महानगरपालिकेच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या काही चित्रिकरण स्थळे शोधण्यात आली असून आगामी काळात त्यात आणखी भर पडेल, असेही यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सांगितले.

परवानगीसाठी स्वतंत्र कक्ष

मुंबईतील विविध ठिकाणी चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या परवानगी आणखी सुलभतेने देणे, महानगरपालिकेने सध्या निश्चित केलेल्या चित्रिकरणाच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरवणे, चित्रिकरणाच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे तसेच पोलिस दल, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि अन्य यंत्रणांचे मिळून चित्रिकरणाच्या अनुषंगाने स्वतंत्र कक्ष सुरू करणे आदींबाबत संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्त काय म्हणाले

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी पुढे म्हणाले की, जगातील अनेक शहरांमध्ये मनोरंजन क्षेत्राचे प्रशासन स्थानिक प्रशासन संस्थेच्या अख्यत्यारित आहे. मात्र मुंबईत मनोरंजन क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रशासन कार्य करते. मात्र हे क्षेत्र अधिक विकसित व्हावे, यास अधिक वैभव प्राप्त व्हावे, यासाठी मुंबईला जागतिक सांस्कृतिक ठिकाण म्हणून पुढे आणण्यासाठी महानगरपालिकाही प्रयत्न करत असल्याचे गगराणी यांनी यावेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसंवादात सहभागी कोण

यावेळी ‘मुंबईच्या आर्थिक विकासात चित्रपटांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, व्हिसलिंग वूड इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचीलकर, प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन आहुजा, मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या वरिष्ठ संचालिका श्रीमती लोहिता सुजीत, चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी या भूमिका मांडली. मुंबईत चित्रिकरणासाठी परवानगीची प्रक्रिया सुलभ करणे, योग्य शुल्क आकारणी करणे, विविध यंत्रणांचे एकिकृत मंच तयार करुन चित्रिकरणासंबंधीत बाबींमध्ये सुसूत्रता आणणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. दरम्यान, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी मनोरंजन क्षेत्रातील विविध अडचणी, प्रशासनाकडून अपेक्षा आदींबाबत मते व्यक्त केली.