बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा शिवसेनेबरोबर वाद सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबरोबर तिचं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना थेट POK शी केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोड चालवला जात आहे.
कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.
महापालिकेकडून ही कारवाई होण्याआधी काल भाजपाचे मुंबईतील आमदार आणि प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करुन ‘मातोश्री’च्या जवळ असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.
“मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर वांद्रे पूर्वमध्ये असलेलं हे अनधिकृत बांधकाम महापालिकेला दिसत नाही ? कदाचित हे सरकारचे जावई असावेत. पण कंगना रणौतच घर आणि कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम शोधण्यासाठी महापालिकचे अधिकारी पोहोचले” असे अतुल भातखळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.