मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील संगीत अकादमीला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण विभागातर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात संगीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा मेगा ब्लॉक, नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी पाच दिवसाचा वाहतूक ब्लॉक

दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे १ ऑक्टोबर रोजी संगीत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा अकादमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान संगीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात गायन, वादन, नृत्य आणि नाट्यकलेचा अनुभव असलेले मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, संगीत शिक्षक व कलाशिक्षक सहभागी होणार आहेत. या सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात शालेय बालकलाकारांच्या पारंपरिक संतरचनांवर आधारित ‘जाऊ संतांचिया गावा’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. अभिनेत्री मानव नाईक, गायिका श्रुती सडोलीकर, मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त गंगाथरन डी. उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> खिचडी गैरव्यवहार प्रकरणः संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

संगीत सप्ताहादरम्यान १० ऑक्टोबर रोजी पराग प्रतिष्ठान प्रस्तुत ‘अत्रेमय’ नाटक सादर केले जाणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी शिक्षकांचा वाद्यवृंद व नाट्यरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शास्त्रीय रागांवर आधारित ‘रागरंग’ हा संगीत कार्यक्रम १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सतारवादक पं. शंकर अभ्यंकर उपस्थित राहणार आहेत. संगीत शिक्षकांच्या ‘सजल नयन’ या कार्यक्रमाने १३ ऑक्टोबर रोजी संगीत सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील विविध अधिकारी या समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या परिश्रमातून साकारलेला हा कार्यक्रम विनामूल्य असून संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संगीत अकादमीतर्फे करण्यात आले आहे.