ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडेच रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. कुणी आम्हाला देशद्रोही म्हटलं तर त्याची जीभ हासडून टाकू, असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नारायण राणे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंच्या खेड येथील सभेबद्दल विचारलं असता नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंची खेड येथील सभा पूर्वनियोजित होती. पूर्वी शिवसेनाच्या सभा जाहीर व्हायच्या. खेडला उद्धव ठाकरे येणार आहेत, असं कळाल्यावर सगळे लोक स्वत:हून सभेच्या ठिकाणी जायचे. आता तसं नाही. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीहून लोकांना सभेसाठी आणलं होतं. ही सभा विराट सभा होती, हे दाखवण्यासाठी सभेतील खुर्च्यांमध्ये दोन लोक झोपतील एवढी जागा सोडली होती. ही सभा विराट सभा नव्हती. सभेला स्थानिक लोक नव्हते.”

“उद्धव ठाकरेंना राज्याच्या विकासाबद्दल आणि जनतेबद्दल काहीही बोलता येत नाही. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काहीही केलं नाही. कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होते, त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. त्यांनी कोकणाला कोणत्या नवीन योजना दिल्या? त्यांनी काहीही दिलं नाही. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नव्हतं. उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात गेले. त्या माणसाकडून जनता काय अपेक्षा ठेवणार… आता शिवसेना संपली आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही त्यांच्या हाताशी राहणार नाहीत,” असं सूचक विधान नारायण राणेंनी केलं. ते मुंबईतील विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- मोठी बातमी: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

नारायण राणे पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात यायची त्यांची ताकद नव्हती, ते महाराष्ट्र कसा पिंजून काढणार? हे शक्य आहे का? ते चार पावलं चालू शकत नाहीत. आता त्यांचं वय नाही. वयात असतानाही ते काही करू शकले नाहीत. आक्रमक शिवसैनिकांमुळे शिवसेना घडली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची एक टक्काही वाटा नाही. त्यांनी कधी एकाला कानफटातही मारलं नाही. हा त्यांचा इतिहास आहे. आघाडी ही जनतेच्या मनातून बिघडली आहे.

हेही वाचा- दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; पोलीस तपासावरच सवाल उपस्थित

उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये जीभ हासडण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले, “आहो, उद्धव ठाकरे कुणाचाही जीभ हासडण्याआधी स्वत:ची जीभ सांभाळा… असंच फिरत राहिलात तर ती जीभही जागेवर राहणार नाही.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane on thackeray group mla will leave party uddhav thackeray khed rally rmm
First published on: 08-03-2023 at 17:20 IST