मुंबई : आपले अस्तित्व धोक्यात न येण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पक्षात स्थान देणार नाहीत, असे प्रतिपादन करीत माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे हे ‘मातोश्री ’ निवासस्थानाचा एक हिस्सा तरी राज ठाकरेंना देणार का, असा खोचक सवालही राणे यांनी केला.
राणे यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांनी कुटुंब म्हणून किती जणांना जवळ केले? राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांना खूप छळले आणि इच्छा नसताना पक्ष सोडायला भाग पाडल्याचा आरोप राणे यांनी केला. ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली, त्याच मराठी माणसाची उद्धव ठाकरे यांनी वाट लावली. मुंबईत १९६० मध्ये मराठी रहिवाशांचे प्रमाण ६० टक्के होते, ते आता फक्त १८ टक्के उरले आहेत. मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्यास उद्धव ठाकरे जबाबदार असून त्यांना आजच मराठी कसे आठवले? मुख्यमंत्री असताना ते फक्त दोन दिवस मंत्रालयात आले. मराठी तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांनी काय केले ? मराठीचा एवढा पुळका आहे, तर स्वत:च्या मुलाला त्यांनी बाँबे स्कॉटिश इंग्रजी शाळेत का टाकले ? असे सवाल राणे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ४० वर्षांत शिवसेनेची उभारणी केली, पण उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात शिवसेना संपविली, असाही आरोप राणे यांनी केला.
राणे खरेच मोठ्या पदापर्यंत गेले आहेत का? त्यांनी त्यासाठी मारामाऱ्या, खून केल्याचा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी एका भाषणात केला होता. त्याबाबत विचारता कोण गोगावले? त्यांना मी ओळखत नाही, असे उत्तर राणे यांनी दिले. राणे यांची विधानभवनात शिवसेना आमदार मिलींद नार्वेकर यांच्याशी भेट झाली.