मुंबई : वैद्यकीय शिक्षण गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण सुलभ झाले आहे. महाराष्ट्रात नव्याने सुरू होणाऱ्या १० वैद्यकीय महाविद्यालयांमुळे राज्यातील तरुणांसाठी नवीन संधीचे दारवाजे खुले झाले आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावेत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत याला सरकारकडून प्राधान्य देण्यात येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून बुधवारी दुपारी १ च्या सुमारास केले. यावेळी ते बोलत होते.

गेल्या १० वर्षांत सरकारने देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’ सुरू केला आहे. आज आपण केवळ इमारती बांधत नाही, तर निरोगी आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत. लाखो नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>युरोपातील बल्लवाचाऱ्याची नोकरी पडली पावणेआठ लाखांना

ठाणे येथील अंबरनाथ, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारदरा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो नागरिकांसाठी सेवेची केंद्रे बनतील. १० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागा निर्माण होणार असून, राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या सुमारे सहा हजार होईल, असेही त्यांनी अधोरेखित केले. लाल किल्ल्यावरून देशात ७५ हजार नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, आजचा कार्यक्रम त्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे.

हेही वाचा >>>पाण्यासाठी आता भाजपच्या माजी नगरसेवकांचेही आंदोलन; माहीम आणि मुलुंडमध्ये धरणे

देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीकडे मोफत वैद्यकीय उपचारांसाठी आयुष्मान कार्ड असून, ७० वर्षांवरील वृद्धांनाही मोफत वैद्यकीय उपचार मिळत आहेत. जनौषधी केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत. हृदयविकाराच्या रुग्णांना हव्या असलेल्या स्टेंटच्या किंमती देखील ८० ते ८५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. सरकारने कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीदेखील आता कमी केल्या आहेत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आता वैद्यकीय उपचार स्वस्त झाले आहे. सरकारने देशातील अत्यंत गरीब व्यक्तीलाही सामाजिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले असल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना मिळणार मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावेत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत याला सरकार प्राधान्य देत आहे. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसल्याने मोठे आव्हान होते. सरकारने हा भेदभाव संपुष्टात आणला असून महाराष्ट्रातील युवकांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल, असे पंतप्रधानानी सांगितले.