मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना उद्योग सुसंगत आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधी करणाऱ्या व्यक्तींची कमतरता जाणवते. त्यामुळे ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या कार्यक्रमांतर्गत नाशिकमधील आयटीआयमधून ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ हा तीन ते सहा महिन्यांचा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे वैदिक संस्कार करणारी व्यक्ती नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे.
नाशिकमध्ये प्रत्येक १२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी वैदिक संस्कार करणाऱ्या व्यक्तींचा अभाव जाणवतो. नाशिक येथे २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये नागरिकांना वैदिक संस्कार करताना अडचण येऊ नये यासाठी रामटेक संस्कृत विद्यापीठाच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध आयटीआयमध्ये ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ हा तीन ते सहा महिन्यांचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ३० विद्यार्थ्यांचा एक वर्ग असणार आहे. मात्र अधिकाधिक तरुणांनी स्वारस्य दाखविल्यास वर्गांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या अभिनव उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. राज्यभरात ६०० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विश्वकर्मा समाजातील कारागीर, स्थानिक कलाकार व पारंपरिक व्यवसायातील तज्ज्ञ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उदयोन्मुख क्षेत्रांतील प्रशिक्षण
ग्रामीण भागातील युवक, तसेच महिला उमेदवारांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महिलांकरीता ३६४ विशेष वर्ग, तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ विशेष वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाइल दुरुस्ती तंत्रज्ञ, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर इत्यादी विषयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली, लातूर, नागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार सुरू करण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षण केंद्रांमध्ये कँडी मेकिंग, फूड प्रोसेसिंग आणि बांबू टॉय मेकिंग अभ्यासक्रमाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.
आयटीआयमध्ये २५०६ तुकड्या सुरू करणार
राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २ हजार ५०६ तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून चालू वर्षात ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षी १ लाख प्रशिक्षणार्थिंना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.