कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपाकडून कटकारस्थान सुरू आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

आणखी वाचा- Mumbai Metro Carshed: “विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा ही ठाकरे सरकारची कार्यपद्धती”

केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. या पत्रात मेट्रो कारशेडची जागा राज्यसरकारने एमएमआरडीएला वर्ग केली ती जागा मिठागरांसाठी आहे आणि आता कारशेडला दिलेली चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे असे म्हटले आहे. तर, याआधी मिठागराच्या बर्‍याचशा जागा राज्यसरकारला केंद्राने २००२ साली वर्ग केल्या आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

आणखी वाचा- “आपली अब्रू, जनतेचे हाल आणि तिजोरीच्या पैशांचा चुथडा सरकारनं त्वरित थांबवावा”

भाजपाचे लोक सुरुवातीला ही खासगी जागा आहे असं सांगत होते आणि आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे असं सांगत आहेत, यावरुन भाजपच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.