राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने माध्यमांमध्ये चर्चेत राहिले आहेत. मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यातील वादाला सुरुवात झाली आणि नवाब मलिक यांची रोजच चर्चा होऊ लागली. सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन नवाब मलिक एनसीबीवर आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवनवे आरोप करू लागले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप देखील केले. त्यांचं कनेक्शन थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा देखील दावा त्यांनी केला. यासंदर्भात चौकशीची मागणी केली असतानाच दुसरीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून दिल्ली एसआयटीनं आपल्या हातात घेतला. त्यामुळे यावरून बराच वाद झाला.
आताही नवाब मलिक यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या या ट्वीटचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे, याविषयी मात्र त्यांनी ट्वीटमध्ये कोणतेही सूतोवाच केलेले नसले, तरी नेटिझन्स मात्र त्यांच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर नवाब मलिक यांचा रोख थेट समीर वानखेडे यांच्या दिशेने असल्याचा देखील निष्कर्ष काढून टाकला!
नेमकं काय आहे या ट्वीटमध्ये?
नवाब मलिक यांनी आज दुपारी हे ट्वीट केलं असून काही मिनिटांमध्येच त्यावर तुफान प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी एक फोटो शेअर केला असून त्यावर ‘पेहचान कौन?’ असा प्रश्न देखील लिहिला आहे. आता नवाब मलिक यांनीच असा प्रश्न केल्यानंतर नेटिझन्स देखील आपापले अंदाज तिथे व्यक्त करू लागले आहेत.
“गांधी लडे थे गोरों से, हम…”, नवाब मलिक यांचं सूचक ट्वीट चर्चेत!
फोटोमध्ये असं आहे तरी काय?
नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये एक कोंबडा दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या या कोंबड्याच्या डोक्यावर लाल रंगाचा एक तुरा देखील आहे. पण विशेष म्हणजे या कोंबड्याचा चेहरा मात्र मांजरीचा आहे.
अर्थात हा फोटो मॉर्फ्ड करून तयार करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील हा फोटो शेअर करताना नवाब मलिक यांना रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे? याची नवी चर्चा सुरू झाली आहे.