Aryan Khan Bail Hearing: ‘अरबाजने बुटातून ड्रग्ज काढले आणि….,” हायकोर्टात एनसीबीच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद

एनसीबीच्या वकिलांनी आरोपींनी जामीन मिळू नये म्हणून जोरदार युक्तिवाद केलाय. आरोपी अरबाज खानने स्वतः त्याच्या बुटातून ड्रग्ज काढून दिले होते, असा दावा एनसीबीने केलाय.

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबान मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, एनसीबीच्या वकिलांनी आरोपींनी जामीन मिळू नये म्हणून जोरदार युक्तिवाद केलाय. आरोपी अरबाज खानने स्वतः त्याच्या बुटातून ड्रग्ज काढून दिले होते, असा दावा एनसीबीने केलाय. यासाठी पंचनाम्याचा आधार घेण्यात आलाय. आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर आहेत. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली.

अनिल सिंग म्हणाले, “आरोपी आमच्याकडे ड्रग्ज सापडले नाही असा युक्तिवाद करत आहे. मात्र, पंचनामा पाहिला तर अरबाजकडे ड्रग्ज सापडले आहेत. अरबाजने स्वतः आपल्या बुटातून ड्रग्ज काढून एनसीबीच्या ताब्यात दिले होते. आरोपी क्रुझ शिपवर ‘ब्लास्ट’ करण्यासाठी जात होते असं चॅटमध्ये म्हटलंय. क्रुझवर २ दिवसांसाठी सेवन करण्यासाठीच त्यांनी सोबत चरस बाळगलं. अरबाजकडे ते सापडले.”

“आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता”

“आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचं माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले.”

“आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडली”

“आरोपींचे वकील ड्रग्ज सेवन केलं होतं की नाही हे स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तीवाद करत आहेत. मात्र, आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्ज बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज बाळगले. हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगण्याचं आहे. आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलीय. सर्व ८ आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो,” असं अनिल सिंग म्हणाले.

हेही वाचा : “ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप, मग वैद्यकीय चाचणी का केली नाही?”, उच्च न्यायालयात एनसीबीवर प्रश्नांचा भडीमार

“व्हॉट्सअॅपच्या चॅटवर आक्षेप घेता येणार नाही, कारण आमच्याकडे आरोपींचे ६५ ब प्रमाणे घेतलेले जबाब आहेत. त्या क्रुझ शिपवर पार्टीचं आयोजन केलं होतं आणि माझे अशील आरोपींना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी अटक केल्याचं सांगत आहेत. तो कोरडा दिवस होता म्हणून आम्ही त्यांना जाऊ द्यावं लागत होतं” असं म्हणत अनिल सिंग यांनी आरोपींच्या वकिलांना टोला लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncb argument over opposing bail to aryan khan and others in cruise ship drugs case pbs

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख