ncp jitendra awhad mocks vedat marathe veer marathi movie akshay kumar | Loksatta

“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरून सध्या वाद चालू असून चित्रपटाच्या चित्रीकरणालाही विरोथ केला जात आहे.

“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!
'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट! (संग्रहीत छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दोन मराठी चित्रपटांवरून मोठा वाद चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटातील दृश्यांवर आणि संवादांवर आक्षेप घेत या चित्रपटाला महाराष्ट्रात अनेकांनी विरोध केला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या चित्रपटाच्या सादरीकरणाचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना तर ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या आरोपांखील अटकही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाच एक भाग असणाऱ्या प्रतापराव गुजर यांचं कथानक प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या कथानकावरही आक्षेप घेतला जात असताना चित्रपटातील एक स्क्रीनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी यावरून खोचक ट्वीट केलं आहे.

YouTube Poster

नेमके किती सरदार होते?

या चित्रपटावर घेण्यात आलेल्या अनेक आक्षेपांपैकी प्रतापराव गुजर यांच्यासमवेत नेमके किती सरकार लढाईसाठी गेले, याबद्दलचा एक आक्षेप आहे. काहींच्या मते ७ तर काहींच्या मते ८ सरदार होते. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली होती. प्रतापराव गुजर यांच्यासमवेत नेमके किती सरकार होते किंवा होते की नव्हते यासंदर्भात कोणताही ऐतिहासिक पुरावा समोर आलेला नाही, असं राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. शिवाय, फक्त प्रतापराव गुजर यांच्या लढाईत मृत्यू झाल्याचा एका ठिकाणी उल्लेख आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, एकीकडे चित्रपटाला विरोध वाढू लागलेला असताना अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यावरूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार योग्य वाटत नसल्याची प्रतिक्रिया अनेक नेटिझन्सनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. त्यावर चित्रपटाच्या टीमकडून मात्र अक्षय कुमारला पाठिंबा दिला जात आहे.

“मी काल पवार साहेबांशीही बोललो, ते म्हणाले…”, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत राज ठाकरेंचं वक्तव्य

चित्रीकरणादरम्यानचा फोटो केला शेअर!

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्याआधीच चित्रपटाची मोठी चर्चा झाली आहे. त्यात आता जितेंद्र आव्हाडांनी चित्रीकरणादरम्यानच्या एका दृश्यातला फोटो शेअर केला आहे. यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, त्याच्यामागे लावलेल्या झुंबराला बल्ब लावल्याचं दिसून येत आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी खोचक टोला लगावला आहे.

“बल्बचा शोध कधी लागला? काय थट्टा लावली आहे? मराछी माणसाला येड्यात काढत आहेत”, असं जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 15:24 IST
Next Story
मुंबई : उघड्या मॅनहोलची समस्या, अनुचित प्रकार घडल्यास महानगरपालिकेला जबाबदार धरणार, उच्च न्यायालयाचा इशारा