मुंबई : बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्य सरकारने कठोर पावले उचलल्याचे स्वागत आहे. मात्र, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी, जालन्याचे कैलास बोराडे आणि लातूरचे माउली सोट या पीडितांना सरकार कधी न्याय देणार? मागास जातीतल्या लोकांना न्याय मिळण्यास विलंब का लागतो, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बुधवारी विधानसभेत महायुती सरकारला घरचा आहेर दिला.

भोकरदनमधील घटनेच्या संदर्भात मकोका लावण्याची सूचना पोलीस अधीक्षकांना करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. यावेळी पुकारलेल्या बंददरम्यान दलित वस्त्यांमध्ये शोधमोहीम राबवून शेकडोंना पोलिसांनी अटक केली. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात कैलास बोराडे या धनगर समाजातील युवकाने शिवमंदिरात प्रवेश केला म्हणून त्याला सळईने चटके दिले. लातूर जिल्ह्यात माउली सोट या धनगर समाजातील युवकास गावगुंडांनी मारहाण केली. पीडितांवर झालेल्या अत्याचाराची छायाचित्रे भुजबळ यांनी सभागृहात दाखवली.

जातीय अत्याचाराचा प्रश्न सरकार आणि पोलिसांपुरता मर्यादित नाही. समाजाने, सभागृहाने यावर विचार केला पाहिजे. हे सर्व थांबायला पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली. विकासाच्या मुद्द्यावरही भुजबळ यांनी सरकारला चार शब्द सुनावले. मुंबईत तुम्ही सिमेंटचे रस्ते करणार मग, ग्रामीण रस्त्यांचे काय ? कंत्राटदारांचे पैसे थकवल्याने सामान्यांना फटका बसल्याचा आरोपही भुजबळांनी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव चर्चेत सुधीर मुनगंटीवार, राम कदम, भास्कर जाधव, रमेश बोरनारे यांनी भाग घेतला.

विधान परिषदेत पडसाद

विधान परिषदेत भोकरदन तालुक्यातील आनवा येथील तरुणाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा सदस्य शशिकांत शिंदे आणि सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. कैलास बोराडे या तरुणाला शिवरात्री दिवशी मारहाण करण्यात आली. संबंधित आरोपी एका राजकीय पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य होता. या बाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते, त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकोका लावणार : शिंदे

जातीय अत्याचारप्रकरणी ३०७ चा गुन्हा न नोंदवता ‘मकोका’ लावला पाहिजे. ही संघटित गुन्हेगारी आहे. भोकरदनच्या कैलास बोराडेप्रकरणी पोलीस अधीक्षकांना तसे मी आदेश दिले आहेत. बोराडे यांच्यावरील उपचाराचा खर्च सरकार करेल. आज सकाळी बोराडे यांच्याशी मी बोललो आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.