शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही सत्ताधारी पक्ष नालेसफाईचे पैसेही सोडत नसल्याने मुंबई पाण्यात जाते असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावर त्यांनी ताशेरे झाडले आहेत. पाऊस पडल्याने मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत टीका केली. नालेसफाईच्या आधी कामाचं टेंडर काढून ते काम मे महिन्यापर्यंत संपवणं अपेक्षित असतं. मात्र मे महिन्याच्या अखेरीस हे काम सुरू केलं जातं आणि जूनच्या सुरूवातीला अर्धवटच संपवलं जातं असाही आरोप आव्हाड यांनी केला.
मागील दोन दिवसात मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. या पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली. रेल्वेसेवा कोलमडली, रस्ते ट्रॅफिकने फुलून गेले. हिंदमातासह अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले. याच सगळ्या मुद्द्यांवर बोट ठेवत जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेवर टीका केली आहे.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे. सायन भागात रूळावर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत उशिरा ऑफिसला पोहचावं लागलं. त्याचमुळे जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
हवामान विभागाने पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठाणे, पालघर, कल्याण आणि डोंबिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडतो आहे. लोकल सेवेवर पावसाचा परिणाम झाल्याने आणि सखल भागांमध्ये पाणी साठल्याने मुंबईकराना त्रास सहन करावा लागतो आहे. मुंबईची कोंडी झाल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपावर निशाणा साधला आहे. आता जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांपैकी कोणी उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.