भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अथक परिश्रमामुळे भारताची चांद्रयान ३ ही मोहिम यशस्वी झाली. हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाने पाहिला आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. यानंतर जगभरातून इस्रोवर अभिनंदानाचा वर्षाव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीही इस्रोचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांना लक्ष्य केलं.

अमोल मिटकरी म्हणाले, “‘मनु’ आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला. लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन् यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात. आता कसं. जयहिंद.”

“या क्षणी अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई यांची आठवण येते”

अमोल मिटकरी यांनी चांद्रयानच्या यशानंतर इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही आठवण काढली. ते म्हणाले, “हा भारत माझा देश आहे. या क्षणी अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई यांची आठवण येते आहे.”

“कुठल्याही कर्मकांडाने व प्रार्थनाने चांद्रयान ३ यशस्वी झाले नाही”

“भारतीय शास्त्रज्ञांना मानाचा मुजरा. हे यश केवळ तुमचे आणि तुमचेच. कुठल्याही कर्मकांडाने व प्रार्थनाने हे यशस्वी झाले नाही. यामागे शास्त्रज्ञांची अखंड मेहनत आहे,” असंही स्पष्ट मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं.

“चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश”

चांद्रयान ३ चं लाईव्ह प्रक्षेपण पाहत असतानाचा आपला एक व्हिडीओ शेअर करत अमोल मिटकरी म्हणाले, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. हा विक्रम ज्यांच्या मेहनतीमुळे शक्य झाला त्या सर्व वैज्ञानिकांना सलाम.”

हेही वाचा : Photos : चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताना शेवटच्या २२ सेकंदात नेमकं काय घडलं? पाहा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारताला चंद्रावरील या मोहिमेत आलेल्या यशाने जगाचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीच रशियासारख्या विकसित देशाची चंद्रावरील मोहिम अपयशी ठरली होती. या पार्श्वभूमीवर इस्रोचं हे यश अनेकांसाठी कौतुकाचा विषय ठरलं आहे. यामुळे अंतराळ संशोधनात भारताचा दबदबा वाढला आहे.