मुंबई : राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १० ते ६० हजार (सरासरी ३० हजार ) या प्रमाणात बनावट मतदारांची नावे घुसवण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ सांभाळणारा भाजप पदाधिकारी देवांग दवे याने हा प्रकार घडवून आणला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गटाचे आमदार रोहीत पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

आमच्या कार्यकर्त्यांनी बनावट मतदारांचा त्या त्या मतदारसंघात शोध घेतला, पण एकसुद्धा मतदार सापडला नाही. पैसे देवून या बनावट मतदारांना इतर मतदारसंघातून मतदानासाठी आणले होते. मतदान करून घेतले आणि परत त्यांच्या मतदारसंघात त्यांना गाडीने पाठवण्यात आले. त्यासदंर्भातली माहिती आमच्याकडे आहे, असे पवार यांनी सांगितले.

देवांग दवे या व्यक्तीने बनावट मतदारांची नावे घुसवली आहेत. दवे हे भाजपचे पदाधिकारी आहेत. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. यादीत कुणाचे नाव समाविष्ट करायचे किंवा काढायचे हे दवेंनी ठरवले. हा प्रकार त्या त्या मतदारसंघातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेऊन केला, अशी माहिती पवार यांनी दिली.

बनावट मतदारांसंदर्भात आम्ही आयोगाकडे माहिती मागवली, ही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. मतदार याद्यांचे विश्लेषण आम्हाला मिळाले पाहिजे. डिजीटल मतदार याद्या देण्यात याव्यात. बीएलओ यांनी मतदारांच्या नोंदी कशा केल्या, याची माहिती मिळायला हवी. मतदानाच्या दिवसाचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळावे आदी मागण्या पवार यांनी यावेळी केल्या.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वाढ झालेल्या मतदारांची आकडेवारी पवार यांनी यावेळी सादर केली. कल्याण ग्रामीण ५७ हजार,भोसरी ५६ हजार, मीरा भाईंदर ५३ हजार, नालासोपारा ५० हजार, चिंचवड ४५ हजार, हडपसर ४३ हजार, शिरुर १० हजार २३०, वडगाव शेरी ११ हजार ०६४, खडकवासला १२ हजार ३३०, पर्वती ८ हजार २३८, हडपसर १२ हजार ७९८, पिंपरी ५४ हजार आणि पनवेलमध्ये ६५ हजार मतदार वाढल्याचा दावा पवार यांनी केला.

घराचे पत्ते बदलून एक नाव दोन ते तीनवेळा नोंदवले गेले. पुरुष मतदार पुन्हा महिला मतदार म्हणून नोंदवला गेला आहे, अशी उदाहरणे पवार यांनी पीपीटी सादरीकरण करून यावेळी दाखवली.

डोनाल्ड ट्रम्पचे काढले आधार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘आधार’ कार्ड यावेळी पवार यांनी ऑनलाईन तयार करून दाखवले. या पद्धतीने अनेकांची आधार कार्ड काढली गेली आणि त्याच पुराव्याव्दारे मतदार ओळखपत्र बनवली आहेत, असा कयास पवार यांनी व्यक्त केला.