मुंबई : राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाआघाडी म्हणून एकत्र लढवायच्या की स्वतंत्रपणे लढवायच्या या बाबतचा निर्णय आठ दिवसांत घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस पक्ष निरीक्षकांसह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहोत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी नुकतीच चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सतत चर्चा होत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवेल की, स्वतंत्रपणे या बाबतचा निर्णय घेतला जाईल. शरद पवार प्रत्येक जिल्हा आणि तालुका अध्यक्षांशी थेट संवाद साधून परिस्थिती समजून घेत आहेत. आम्ही कार्यकर्त्यांवर निर्णय लादणार नाही. कार्यकर्त्यांची मागणीच अंतिम असेल. त्या नुसार अधिकृतपणे घोषणा केली जाईल, असेही सुळे म्हणाल्या.

लावण्याचे कार्यक्रमासाठी पक्ष फोडला का ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) नागपूर कार्यालयात लावणीचा कार्यक्रम झाल्याची चित्रफीत अस्वस्थ करणारी होती. लाखो मतदार, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या कष्टाने उभा राहिलेला हा पक्ष आहे. लोकांची सेवा करण्यासाठी, धोरण ठरविण्यासाठी पक्षाची स्थापना झाली आहे. आज राज्यात शेतकरी उध्वस्त झाला आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे समाजात प्रचंड असंतोष असताना एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम होणे, हे दुर्दैवी आहे. हे कोणत्याच संस्कृतीत बसत नाही. असले प्रकार करण्यासाठी पक्ष फोडला का ? असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला.

अतिवृष्टी बाधितांना मदत पोहचली नाही

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे ४४ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक नष्ट झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत म्हणून ३ हजार १८२ कोटी रुपयांची तोकडी मदत जाहीर केली. जाहीर केलेली मदत ही वेळेवर मिळाली नाही. अद्यापही जवळपास १६ लाख शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदतीची रक्कम पोहोचू शकली नाही. शेतकऱ्यांना खरोखरच मदत करायची शासनाची भूमिका असेल, तर त्यांनी राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करुन सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणीही सुळे यांनी केली.

लोकशाही संपविण्याचा घाट

तुमच्या भ्रमणध्वनीवर, तुम्ही समाज माध्यमांवर पाठविलेल्या संदेशांवर आमचे लक्ष आहे. जो विरोध करेल, त्यांना पक्षात घ्या, असे भाजप नेते म्हणत असतील तर हा लोकशाही संपविण्याचा घाट आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.