मुंबई : ९८ व्या अकॅडमी ॲवॉर्ड्सच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा विभागासाठी नीरज घेवान दिग्दर्शित ‘होमबाऊंड’ या चित्रपटाची भारताकडून अधिकृतरित्या निवड करण्यात आली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (एफएफआय) शुक्रवारी कोलकात्ता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत २४ भारतीय चित्रपटांमधून ‘होमबाऊंड’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याची घोषणा केली.

कोलकात्ता येथील ग्लोब सिनेमा या ऐतिहासिक वास्तूत ऑस्करसाठी पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटाची निवड प्रक्रिया पार पडल्याची माहिती ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष फिरदौस हसन यांनी दिली. प्रख्यात दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक समितीने ‘होमबाऊंड’ची ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत चित्रपट म्हणून निवड केली. २०२६ मध्ये होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा विभागात प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातील २४ चित्रपट स्पर्धेत होते.

या चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चन अभिनित ‘आय वॉंट टु टॉक’, ‘पुष्पा २’, ‘द बंगाल फाईल्स’ या व्यावसायिक चित्रपटांसह ‘जुगनुमा’, ‘फुले’ अशा वेगळ्या चित्रपटांचाही समावेश होता. मराठीत सध्या गाजणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटासह ‘स्थळ’, ‘साबर बोंडं’ आणि ‘आता थांबायचं नाय’ हे चार मराठी चित्रपटही या स्पर्धेत होते. परीक्षक समितीने या २४ चित्रपटांमधून अभिनेता ईशान खत्तार, विशाल जेठवा आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘होमबाऊंड’ या चित्रपटाला पसंती दिली.

यावर्षीच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह नुकत्याच झालेल्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही ‘होमबाऊंड’ला वैश्विक स्तरावरील प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. पुढच्या आठवड्यात २६ सप्टेंबरला हा चित्रपट देशभरात चित्रपटगृहातून प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच ऑस्करसाठी भारताचा अधिकृत चित्रपट म्हणून निवडले जाण्याचा मान या चित्रपटाला मिळाला आहे. गेल्यावर्षी ‘लापता लेडीज’ हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.