लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) नागपाडा येथे एका ५५ वर्षीय नायजेरियन तस्कराला पकडले. त्याच्याकडे २०० ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्याची किंमत ८० लाख रुपये इतकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-चक्रीवादळाचा मुंबईत इशारा नाही- हवामान विभाग

नागपाड्याच्या मदनपुरा परिसरात एक नायजेरियन अमलीपदार्थ तस्कर कोकेन घेऊन येणार असल्याची माहिती वरळी कक्षाला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक संदीप काळे व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता. त्यावेळी नायजेरियन नागरिक क्रिस्टोपर (५५) हा संशयास्पद हालचाल करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ २०० ग्रॅम कोकेन सापडले. त्याला अटक केल्यावर तो बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत असल्याचे उघड झाले. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.