मुंबई : मागील काही महिन्यांपासून नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत धारावीतील ८५ हजार सदनिकांना क्रमांक देण्याचे काम एनएमडीपीएलने पूर्ण केले. ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा रखडलेला पुनर्विकास अखेर आता मार्गी लागत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत धारावीकरांची पात्रता निश्चिती करण्यासाठी एनएमडीपीएलकडून मार्च २०२४ पासून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरुवातीला या सर्वेक्षणास धारावीकरांकडून तीव्र विरोध झाल्याने काही ठिकाणी सर्वेक्षण बंद ठेवावे लागले. मात्र मागील काही महिन्यांपासून सर्वेक्षण वेगात सुरू असून सर्वेक्षण करणारी पथके वाढविण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत ८५ हजार घरांना क्रमांक देण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती डीआरपीकडून देण्यात आली. बुधवारी ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण करून एनएमडीपीएलने एक मोठा टप्पा पार केल्याचेही डीआरपीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, २००७-०८ मध्ये मशाल संस्थेने धारावीत सर्वेक्षण केले होते. त्यावेळी ६० हजार झोपडीधारक पुनर्वसनासाठी पात्र ठरले होते. दरम्यानच्या काळात घरांच्या संख्येत वाढ झाल्याने अंदाजे दीड लाख धारावीकरांचे पुनर्वसन धारावी पुनर्विकास योजनेअंतर्गत करावे लागण्याची शक्यताही डीआरपीकडून व्यक्त करण्यात आली आहे. पोटमाळ्यावरील रहिवाशांना, अपात्र रहिवाशांनाही पुनर्वसन योजनेत समावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने रहिवाशांची संख्या वाढणार आहे. पात्र आणि अपात्र रहिवासी किती असतील, किती रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागेल हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वेक्षण वेगाने पूर्ण व्हावे यासाठी धारावीकरांनी सहकार्य करावे. काही कारणामुळे सर्वेक्षण होऊ न शकलेल्या रहिवाशांनी पुढे येऊन लवकरात लवकर सर्वेक्षण करून घ्यावे, असे आवाहन यानिमित्ताने डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी केले आहे. पात्रता निश्चितीच्या दृष्टीने हे सर्वेक्षण खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुनर्वसनातून कोणीही वगळले जाऊ नये यासाठी रहिवाशांनी सर्वेक्षणात सहभागी व्हावे असेही त्यांनी स्पष्ट केले.