एलिफंटा लेण्यांना भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना आता समुद्र मार्गाबरोबरच दळणवळणाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई ते एलिफंटा असा आठ किमीचा रोप-वे बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान चार वर्षाचा कालावधी लागणार आहे. साधारणत: २०२२ पर्यंत काम पुर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोप-वे सुरू झाल्यानंतर सध्याचा बोटीचा एक तासाचा प्रवास फक्त १४ मिनिटांतच होणार आहे.
पहिल्यांदा शिवडी ते एलिफंटा अशी ६.९ किमीची ३० आसनी ‘केबल कार’ सुरु करण्याचा विचार होता, पण फ्लेमिंगोंमुळे हा प्रस्ताव गुंडाळावा लागला होता. आता केंद्र सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी मुंबई ते एलिफंटा असा रोप-वे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे समुद्रात रोप-वे बांधण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असेल. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने नेमलेल्या आर्थिक सल्लागार समितीने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.
‘घारापुरी किंवा एलिफंटा लेणी असलेल्या या बेटाला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केले आहे. भारतातली सर्वाधिक प्राचीन लेणी असलेल्या या बेटाला दरवर्षी लाखों देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. रोप-वेमुळे पर्यटकांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा या जलमार्ग प्रवासाला बोटीने सध्या एक तास लागतो. रोप-वेनंतर लोकांचा वेळही वाचणार आहे. तसेच समुद्रावरून जाणाऱ्या रोप-वेमुळे पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल असे सांगण्यात येत आहे. “प्रथम हा प्रकल्प शिवडी-एलिफंटा असा होता. पण सुरक्षेच्या कारणामुळे हाजी बंदर-एलिफंटा असा करण्यात आला आहे,” असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले.
सुत्रांच्या माहितीनुसार, या रोप-वेच्या उभारणीसाठी ६०० कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार असून २०२२ पर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर हा रोप-वे तयार केला जाणार आहे. ८ किमी ३०० मीटर लांबीचा हा रोप वे समुद्राच्या पाण्यापासून १५० मीटर उंचीवर असेल. मुंबई ते एलिफंटा या भागाला जोडणारा हा प्रस्तावित रोप-वे जगातील सर्वात जास्त लांबीचा ठरेल असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, फेब्रुवारी २०१८ च्या सुरूवातीला जागतिक वारसा लाभलेल्या देशातील १७ सौंदर्यस्थळांपैकी एक असलेल्या एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे सत्तर वर्षांनंतर प्रथमच वीज पोहोचली. महावितरण कंपनीने हा वीजपुरवठा करता यावा म्हणून समुद्राच्या तळाखालून विजेच्या केबल्स टाकल्या आहेत. वीज आल्यानंतर येथील लोकांना रोजगाराच्या आणखी संधी मिळाल्या आहेत. आता रोप-वेमुळे त्यात भर पडणार आहे. एलिफंटाकडे पर्यटकांचा कल वाढण्याच्या दृष्टीने हा चांगला प्रकल्प असल्याचे म्हटले जात आहे.