मुंबई : जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली होती. परंतु, मे महिन्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मागील काही दिवसांत सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, मुंबईत करोनाचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधूनमधून आढळून येत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते सतत लक्ष ठेवून आहे. जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत करोना रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून येत होती. परंतु, मे महिना सुरू झाल्यापासून करोना रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच, करोना संबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत महानगरपालिकेचे दवाखाना, रुग्णालयांत जाऊन उपचार घ्यावा. स्वतःहून औषधे घेऊ नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
केईएम रुग्णालयातील मृत रुग्ण मुंबईबाहेरील केईएम रुग्णालयात करोनाबाधित मुलगी (१४) आणि महिला (५४) या दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु, हे मृत्यू करोना नाही, तर नेफ्रोटिक सिंड्रोम विथ हायपोकॅल्सेमिक सिझर्स आणि कर्करोगामुळे झाल्याचे रुग्णालयातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
करोनाचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज
मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये करोनावरील उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये एमआयसीयूच्या २० खाटा, मुले व गरोदर स्त्रियांसाठी २० खाटा आणि सामान्य रुग्णांसाठी ६० खाटा सज्ज ठेवल्या आहेत. तसेच, कस्तुरबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दोन खाटा व १० खाटांचा विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास सदर क्षमता त्वरित वाढविण्यात येणार असल्याचे मुंबई पालिकेकडून सांगण्यात आले.