मुंबई : ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या प्रदूषकांच्या दैनंदिन सरासरी पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत यात सर्वाधिक वाढ ऑक्टोबर महिन्यात झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील १९ ठिकाणांवरील हवा प्रदूषण मापकांवर पीएम २.५ ची सर्वाधिक नोंद झाली. तर, ७ ठिकाणांवरील हवा प्रदूषण मापकांवर पीएम १० ची सर्वाधिक नोंद झाली आहे. ही वाढ १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत म्हणजेच दिवाळीत झालेली आहे.

पीएम २.५ जाडीचे आणि त्यापेक्षाही सूक्ष्म धूलिकण जास्त धोकादायक समजले जातात. हवेत पीएम २.५ चे प्रमाण जास्त असते तेव्हा धुरक्याचे प्रमाण वाढते. मुंबईत १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत म्हणजेच दिवाळीत पीएम २.५ ची सर्वाधिक नोंद झाली. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लिन एअर’ या संस्थेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीचे विश्लेषण केले.

या नोंदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) आणि मुंबई महापालिकेने स्थापित केलेल्या प्रदूषण मापकांद्वारे केल्या जातात. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान, पीएम २.५ बरोबरच पीएम १० ची देखील सर्वाधिक नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) पीएम१० ची (१० मायक्रॉन व्यासाच्या कणाांसाठी) २४ तासांच्या सरासरीसाठी १०० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकी मर्यादा निर्धारित केली आहे. तर पीएम २.५ साठी (२.५ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा लहान व्यासांच्या कणांसाठी) ही मर्यादा ६० इतकी आहे. पीएम २.५ आणि पीएम १० हवेतील मुख्य प्रदूषके आहेत.

पीएम २.५ चे सर्वाधिक झालेल्या नोंदी

केंद्र – प्रमाण – तारीख

  • विलेपार्ले – १०४ – १९ ऑक्टोबर
  • पवई – ९७ – २२ ऑक्टोबर
  • बोरिवली – ८६ – २० ऑक्टोबर
  • कुलाबा – ८० – १८ ऑक्टोबर
  • वांद्रे-कुर्ला संकुल – २१२ – २१ ऑक्टोबर
  • माझगाव – १३० – २१ ऑक्टोबर
  • मालाड – १८८ – २१ ऑक्टोबर
  • भायखळा – ११९ – २१ ऑक्टोबर

पीएम १० चे सर्वाधिक झालेल्या नोंदी

केंद्र – प्रमाण – तारीख

  • पवई – २०० – २० ऑक्टोबर
  • देवनार – ३२१ – २० ऑक्टोबर
  • बोरिवली – २४१ – १९ ऑक्टोबर
  • मालाड – ३२२ – २१ ऑक्टोबर
  • मुलुंड – २३४ – २० ऑक्टोबर
  • कांदिवली – १३४ – २१ ऑक्टोबर
  • घाटकोपर – २२४ – २० ऑक्टोबर

पीएम २.५ धूलीकणांमुळे होणारा त्रास

या धूलीकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्रॉंकायटिस, तसेच श्वसनाचे इतर विकार होण्याची शक्यता असते. कारखाने, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, रस्त्यांवरील धूळ यामुळे पीएम २.५ धूलिकणांची निर्मिती होते. ते सूक्ष्म असल्यामुळे हवा आणि वातावरणात तरंगत असतात.

मुंबईची हवा समाधानकारक

समीर ॲपच्या नोंदीनुसार, शुक्रवारी मुंबईची हवा समाधानकारक श्रेणीत नोंदली गेली. मुंबईचा हवा निर्देशांक शुक्रवारी ७५ इतका होता. मुंबईत गुरुवारी सायंकाळी पाऊस पडला. त्यामुळे मुंबईच्या हवेत काहीशी सुधारणा झाली. मागील दोन – तीन दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला होता.

वांद्रे – कुर्ला संकुल येथे शुक्रवारी हवा निर्देशांक ८३ इतका होता. बोरिवली येथे ६१, भायखळा येथे ४४, चेंबूर येथे ४५, कुलाबा येथे ३९, देवनार येथे ७७, घाटकोपर येथे ६५, कांदिवली येथे ६५, कुर्ला येथे ६९ आणि मालाड येथे ९२ इतका हवा निर्देशांक होता.