लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात समन्स बजावूनही अनुपस्थित राहणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या नावे माझगाव दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी जामीनपात्र वॉरंट काढले. त्यामुळे, राणे यांना पुढील सुनावणीच्या वेळी उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.

येत्या १० जूनपर्यंत संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरतील, असे वक्तव्य नितेश राणे यांनी ७ मे रोजी केले होते. त्यांच्या या व्यक्तव्यावर आक्षेप घेऊन राऊत यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्याची दखल घेऊन न्यायालयाने राणे यांना १६ ऑक्टोबर रोजी समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, मंगळवारच्या सुनावणीला राणे न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यामुळे. न्यायालयाने राणे यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट काढले.

आणखी वाचा-‘लिव्ह इन’ मधल्या प्रेयसीची हत्या, मुंबईत बॅगमध्ये आढळेल्या मृतदेहाचं गूढ ३६ तासांनी उकललं, आरोपी अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने बजावलेले समन्स आपल्याला अद्यापपर्यंत मिळालेले नाही, असा दावा राणे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. मात्र, स्पीड पोस्टद्वारे समन्स पाठवण्यात आल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच, एक महिना आणि पाच दिवस उलटूनही आपल्याला समन्स मिळाले नसल्याच्या राणे यांच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. त्याचवेळी, राणे यांच्या नावे काढण्यात येणारे जामीनपात्र वॉरंट त्यांच्या कणकवली येथील घरी स्पीड पोस्टने पाठविणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.