Ola Fares Mumbai Government Rules / मुंबई : ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲग्रीगेटर्सद्वारे जादा प्रवासी भाडे आकारताना कॅब चालकाला मोबदलाही कमी दिला जात होता. त्यामुळे परिवहन विभागाने त्यावर कारवाई करून निश्चित दर ठरवून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. परंतु, नियमानुसार दर आकारणी केली जात नसल्याने २३ सप्टेंबर रोजीपासून ओला, उबर, रॅपिडोचे कॅबचालक सरकारी नियमाप्रमाणे प्रवासी दर आकारले जाईल.

ओला, उबरसारख्या ॲप आधारित टॅक्सी सेवांच्या चालकांना प्रतिकिमी ८ ते ९ रुपये दिले जातात. त्यात इतर वाहतूक खर्च असल्याने चालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्यामुळे ॲप आधारित टॅक्सी चालकांनी संप, आंदोलने, शासनाशी पत्रव्यवहार केला. तसेच, ॲप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत होती. ही लूट रोखण्यासाठी, परिवहन विभागाने ओला, उबर, रॅपिडोसारख्या कंपन्यांद्वारे वाढीव किमत मर्यादित केली आहे.

रिक्षा आणि कॅब यासाठी आरटीओ विभागाने निश्चित केलेले दर ॲग्रीकेटरला लागू होतील. टॅक्सीसाठी प्रतिकिमी २०.६६ रुपये आणि वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रतिकिमी २२.७२ रुपये दर असेल. नव्या दरपत्रकाचे पालन न केल्यास परिवहन विभागाद्वारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांना प्रत्येक वाहन फेरीद्वारे गोळा केलेल्या भाड्याच्या किमान ८० टक्के रक्कम चालकांना देणे बंधनकारक केले आहे.

ओला, उबर, रॅपिडो बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. शासनाच्या प्रत्येक आदेशाला पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि कॅब चालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्यामुळे आता शासनाने ठरविलेल्या प्रवासी दरानुसार भाडे आकारणी केली जाईल. प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कंपन्यांची असेल. – डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच.

बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ज्या कंपन्यांवर राज्याच्या परिवहन विभागाने गुन्हे दाखल केले. त्या कंपन्यांना ई-बाइक टॅक्सीसाठी तात्पुरता परवाना देते. पांढऱ्या रंगाच्या वाहन क्रमाकांच्या पाट्या आणि पेट्रोलवर धावणाऱ्या बाइकचा वापर केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ॲग्रीगेटर कंपनीकडून नियम धुडकावले जात आहेत. गुन्हे दाखल झालेल्या तिन्ही कंपन्यांना बाइक टॅक्सी परवान्यासाठी सरकारने काळ्या यादीत टाकणे आवश्यक आहे, असे मत भारतीय गिग कामगार मंचाद्वारे व्यक्त करण्यात आले.

ॲप आधारित कॅब चालक आता ”ओन्ली मीटर” या संकेतस्थळाचा वापर करून दर आकारणार आहेत. प्रवाशांनी ओला, उबर किंवा इतर ॲपवरून कॅब आरक्षित केल्यानंतर, त्या ॲपवर दर्शविण्यात येणारे भाडे न आकारता, ”ओन्ली मीटर” या संकेतस्थळावरून भाडे आकारले जाईल. ॲपवर दाखविण्यात आलेल्या किमी हे ”ओन्ली मीटर” संकेतस्थळावर देऊन, एकूण प्रवासाचे दर त्यात येईल.

  • हचबॅक म्हणजेच छोट्या गाड्यांसाठी २८ रुपये प्रति किमी दर आकारले जातील.
  • सेडान म्हणजेच मध्यम गाड्यांसाठी ३१ रुपये प्रतिकिमी दर आकारले जातील.
  • एस यु व्ही म्हणजेच मोठ्या गाड्यांसाठी ३४ रुपये प्रति किमी दर आकारले जातील.