इंडिया आघाडीची सध्या मुंबईत महत्त्वाची बैठक सुरू आहे. ही बैठक उद्याही (१ सप्टेंबर) होणार आहे. एनडीएविरोधात एकवटलेल्या विरोधकांच्या या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार, जागा वाटप कसं होणार, संयोजक कोण असणार या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपाप्रणित एनडीए आगामी लोकसभा निवडणूकही विद्यमान पतंप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात लढणार आहे. तर विरोधकांचा नेता कोण असणार? हे अद्याप ठरलेलं नाही. इंडिया आघाडीतल्या नेत्यांना सातत्याने याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.

इंडिया आघाडीला अद्यापही संयोजक ठरवता आलेला नाही, ते पंतप्रधान काय ठरवणार अशी टीका भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. यावर बुधवारी (३० ऑगस्ट) झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, “इंडिया आघाडीच्या संयोजकासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवू शकतो.”

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला काही वेळापूर्वी मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अब्दुल्ला यांना इडिंयाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल विचारलं. त्यावर ओमर अब्दुल्ला म्हणाले, पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल या गोष्टीची घोषणा करण्याची आत्ताच गरज आहे असं मला वाटत नाही. आधी निवडणूक होऊ द्या, बहुमत मिळू द्या, त्यानंतर निर्णय होईल.

हे ही वाचा >> “तो पैसा कोणाचा?” मुंबईत येताच अदाणी प्रकरणावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओमर अब्दुल्ला म्हणाले, इंडिया आघाडीत एक संयुक्त संयोजक असायला हवा. तसेच कार्यकारिणीची गरज आहे. जशी सध्याची परिस्थिती आहे, ती पाहता, आम्ही अशा प्रकारे दर दोन महिन्यांनी बैठका घेऊ शकत नाही. मला वाटतं एक कार्यकारिणी असेल तर त्यांच्या सातत्याने बैठका होतील आणि त्याचा इंडिया आघाडीला फायदा होईल.