महापरिनिर्वाण दिनी लोकल वेळापत्रक सुरळीत ठेवण्याची सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेली असताना मध्य रेल्वेवरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद आणि कल्याण दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रक दुपारी १२ वाजल्यापासून विस्कळीत झाले आहे. लोकल विलंबाने धावत असून प्रवाशांना मोठ्या गर्दीला सामोरे जावे लागत आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकल वेळापत्रक सुरळीत राहावे, गर्दीचे नियंत्रण आणि नियोजन करावे आदी सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबईमध्ये आयोजित बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र मंगळवारी मध्य रेल्वेवरील सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल दुपारी १२ वाजल्यापासून १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत. या लोकल विलंबाने धावत असल्याची उद््घोषणा डोंबिवली, ठाणे, घाटकोपरसह अन्य स्थानकांत करण्यात जात आहे. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढत आहे.

हेही वाचा: मुंबई महानगरपालिकेच्या शाळेकडे पालकांची पाठ; विद्यार्थ्यांसाठी नेमके काय करते प्रशासन… तरीही कोणत्या त्रुटी राहतात… वाचा

जलद लोकलवरील प्रवासी धीम्या लोकलकडे वळत असल्याने गोधळ उडत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयायांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लोकलच्या गर्दीमध्ये भर पडत आहे. दरम्यान, जलद लोकल विस्कळीत होण्यामागील कारण मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यातच कल्याणच्या दिशेने जाणाऱ्याही लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. या मार्गांवरील लोकलही १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यातच दुपारी १२.१५ च्या सुमारास सीएसएमटी-ठाणे लोकल फलाट क्रमांक १ वर आली आणि ही लोकल नंतर कारशेडमध्ये नेण्यात आली.

हेही वाचा: प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “उद्धव ठाकरेंनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र विलंबाने धावत असलेली लोकल आणि फलाट क्रमांक १ वर आलेली लोकल कारशेडला नेण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाल आहेत. ही लोकल कारशेडमध्ये घेऊन जाण्यास प्रवाशांनी विरोध केला आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन ती लोकल सोडण्याची मागणी केली. मात्र रेल्वेच्या वेळापत्रकानुसार तसे करता येणार नाही, अशी समजूत काढल्यानंतर ही लोकल पाच ते दहा मिनिटांनी कारशेडमध्ये रवाना केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडत असून त्याबाबत मध्य रेल्वेकडून विविध कारणे सांगण्यात येत आहेत.