मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई – नागपूरदरम्यान प्रवास करणारे प्रवासी – वाहनचालकांना एक वेगळा अनुभव घेता येणार आहे. अतिजलद प्रवास करतानाच प्रवासी, चालकांना स्थानिक लोकसंस्कृतीची अनभुती घेता येणार आहे. शेवटच्या टप्प्यातील ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर वारली चित्रकला, विपश्यना ध्यान साधना, शेती व्यवसायाची माहिती देणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. स्थानिक लोकसंस्कृतीची अनुभूती प्रवासादरम्यान प्रवासी – वाहनचालकांना घेता यावी आणि या लोकसंस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने बोगद्यावर विविध लोकसंस्कृतीची चित्रे रेखाटण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.

एमएसआरडीसी नागपूर मुंबई दरम्यान ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधत आहे. यापैकी ६२५ किमी लांबीचा महामार्ग पूर्ण झाला असून हा महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. आता या महामार्गावरील इगतपुरी – आमणे दरम्यानच्या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. उर्वरित कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग सेवेत दाखल होणार असून नागपूर – मुंबई थेट प्रवास केवळ आठ तासात करता येणार आहे. त्यामुळे हा टप्पा केव्हा वाहतूक सेवेत दाखल होतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता मुंबई – नागपूरदरम्यानचा प्रवास करताना वाहनचालक – प्रवाशांना वारली लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

हे ही वाचा… देवनारमध्ये वीजनिर्मिती वाढीस केंद्राचा विरोध; प्रकल्प मंजुरीनंतर वीजनिर्मिती क्षमता वाढवणे नियमबाह्य असल्याचा अभिप्राय

हे ही वाचा… म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इगतपुरी – आमणे टप्प्यात एकूण पाच बोगदे असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून खडतर मार्ग काढत हे बोगदे बांधण्यात आले आहेत. अभियांत्रिकी आव्हानाचे उत्तम नमुने म्हणून या बोगद्यांकडे पाहिले जाते. हे पाचही बोगदे एकूण ११ किमी लांबीचे आहेत. यातील ७.७८ किमी लांबीच्या इगतपुरी – कसाला या सर्वात मोठ्या बोगद्यावर वारली चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या बोगद्यातून आठ मिनिटांचा प्रवास करताना वारली संस्कृतीचे चित्ररुपात दर्शन घडणार आहे. निसर्गरम्य असा इगतपुरी परिसर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातोच, पण त्याचवेळी इगतपुरीमध्ये सर्वात मोठे विपश्यना केंद्र आहे. त्यामुळे एका बोगद्यावर विपश्यना ध्यानसाधनेची माहिती चित्रकलेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर एका बोगद्यावर लोकजीवन, शेतीव्यवसाय आदीची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. लोकसंस्कृतीची अनुभूती देण्याचा, लोकसंस्कृतीचे संवर्धन करून बोगद्याच्या सौंदर्यात भर घालण्याच्या आणि प्रवाशांचा प्रवास एका वेगळ्या अुनुभूतीसह करण्याच्या उद्देशाने बोगदे चित्रांनी सजविण्यात आल्याचे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.