मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आणखी एक माजी नगरसेवक विलास चावरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येलाच वांद्रे विधानसभेतील माजी नगरसेवक फोडण्याचा मुहूर्त साधत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. चावरी यांच्यासह खारदांडा परिसरातील कोळी बांधवांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटातील नाराज माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना हेरून त्यांना आपल्या पक्षात आणण्यात शिंदे गटाला यश येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील माजी नगरसेवकांबरोबरच पदाधिकारी आणि कॉंंग्रेस व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांनाही आपल्या पक्षामध्ये आणण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला यश आले आहे. गेल्याच आठवड्यात ठाकरे गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर या आठवड्यात सोमवारी रात्री वांद्रे येथील माजी नगरसेवक विलास चावरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी झालेल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी त्यांच्यासह वांद्रे खार दांडा परिसरातील असंख्य कोळी बांधव उपस्थित होते.

हेही वाचा – मुंबई: वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन चोरल्याप्रकरणी गुन्हा

विलास चावरी हे कोळी समाजाचे असून खार दांडा येथील कोळी समाजामध्ये त्यांचा दबदबा आहे. खार दांडा शाखेचे ते काही वर्षे शाखाप्रमुख होते. २००७ व २०१२ असे दोनदा ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेने विधानसभेची उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. रायगड जिल्ह्याचे ते संपर्कप्रमुखही होते. मात्र गेली काही वर्षे ते शिवेसेनेत सक्रिय नव्हते, असे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पक्ष प्रवेशाच्या वेळी चावरी म्हणाले की, गेली कित्येक वर्षे पक्षासाठी पडेल ते सर्व काम जबाबदारीने पार पाडले. मात्र गेल्या काही वर्षांत नेतृत्वाकडून अपेक्षित मदत मिळत नव्हती. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाले होतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे हात अधिक बळकट करण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई: शिवसेनेच्या प्रचार साहित्यांनी सजले स्टॉल्स, प्रचार साहित्य घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

कोळी बांधवांना मासेमारी करताना अडचण येऊ नये यासाठी सागरी किनारा मार्ग बांधताना दोन खांबातील अंतर वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील कोळीवाड्यांचा सुनियोजित विकास करून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच वांद्रे परिसरात कोळी बांधवांना भेडसावणारे गावठाण तसेच पुनर्विकासाचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच या भागातील विकासकामे वेगाने मार्गी लागावी यासाठी निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, संतोष खरात, दिलीप लांडे, परमेश्ववर कदम, आत्माराम चाचे, वेशाली शेवाळे, भारती बावदाने, मानसी दळवी, अमेय घोले, किरण लांडगे, चंद्रावती मोरे, सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि माजी नगरसेविका स्नेहल शिंदे, तृष्णा विश्वासराव या ३६ माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.