मुंबई : गेल्या नऊ महिन्यांमध्ये मध्य रेल्वे उपनगरीय मार्गांवरील वातानुकूलित लोकलमधून तब्बल एक कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून एप्रिलनंतर वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. वातानुकूलित लोकलमधून डिसेंबर २०२२ मध्ये एकूण १२ लाख ३९ हजार ४१९ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.

मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी – ठाणे, कल्याण, डोंबिवली अंबरनाथ, टिटवाळादरम्यान वातानुकूलित लोकलच्या दररोज ५६ फेऱ्या होत आहेत. एप्रिल २०२२ मध्ये वातानुकूलित लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ५१ हजार १७० इतकी होती. मे महिन्यापासून तिकीट दरात कपात करण्यात आली आणि प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली. सध्या या फेऱ्यांमधून दररोज दोन लाख ७० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.

हेही वाचा >>> १२ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल – डिसेंबर २०२२ या कालावधीत वातानुकूलित लोकलमधून एक कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. मे २०२२ पासून वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणीच्या दैनंदिन तिकिटांचे भाडे कमी करण्यात आले. त्यातच सप्टेंबर २०२२ मध्ये, रेल्वेने प्रथम श्रेणी त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक हंगामाच्या तिकीटधारकांना वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करण्याची सुविधा दिली. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एप्रिल २०२२ मध्ये एकूण पाच लाख ९२ हजार ८३६ प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला होता. त्यानंतर मेमध्ये प्रवासी संख्या आठ लाख ३६ हजार ७०० एवढी झाली. डिसेंबर २०२२ मध्ये एकूण १२ लाख ३९ हजार ४१९ प्रवाशांनी या लोकलमधून प्रवास केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई : पूर्व उपनगरातील पाणी गळतीचा प्रश्न सोडविण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या नऊ महिन्यांत वातानुकूलित लोकलमुळे मध्य रेल्वेला एक कोटी ४७ लाख २७ हजार रुपये उत्पन्न  मिळाले आहे. १६ डिसेंबर २०२२ रोजी सर्वाधिक ११ हजार १८९ तिकिटांची विक्री झाली. तर ५ डिसेंबर रोजी एक हजार २०२ पासची खरेदी प्रवाशांनी केली. विनातिकीट, सामान्य लोकलचे तिकीट किंवा पासवर वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी काही वातानुकूलित लोकलना गर्दी होत आहे. परिणामी, वातानुकूलित लोकलचे तिकीट किंवा पास काढून प्रवास करणाऱ्याना गर्दीचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षभरात वातानुकूलित लोकलचे तिकीट वा पास नसणाऱ्या २० हजारांहून अधिक प्रवाशांची मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी धरपकड केली आहे. त्यांचाकडून ३८ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.