मुंबई – कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या नावाने व्यावसायिकाकडे २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी याच व्यावसायिकाच्या कंपनीत काम करणारा कर्मचारी असून ऑनलाईन खेळात ३ लाखांचे कर्ज झाल्याने त्याने आपल्या मालकाला धमकावून पैसे उकळण्याची योजना आखली होती.

तक्रारदार मालव शहा (५८) हे जुहू येथे राहतात. त्यांची प्रोग्रेसिव्ह सरफेस सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून गोरेगाव येथे कंपनीचे कार्यालय आहे. मंगळवार २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता शहा आपल्या कार्यालयात असताना त्यांना एका अनोखळी मोबाईल क्रमांकावरून फोन आला.

२५ लाखांची खंडणी

कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. शहा यांच्याबाबत सर्व माहिती असल्याचा दावा त्याने केला. शहा आणि त्यांच्या दोन मुलींना मारण्यासाठी २५ लाखांची सुपारी देण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी लॉरेन्स बिष्णोईचे गुंड गोरेगाव येथील कार्यालय, जुहू येथील निवासस्थान तसेच वसईतील कारखान्यात पाळतीवर असल्याचे सांगितले. सुपारीच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देण्याची त्याने मागणी केली. ती न दिल्यास संपूर्ण कुटुंबालाच ठार मारेन अशी धमकी त्याने दिली. या प्रकरणी शहा यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (४) आणि धमकावल्याप्रकरणी कलम ३५१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

सिम कार्डावरून शोध

या गुन्ह्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव असल्याने गोरेगाव पोलीस आणि गुन्हे शाखा समांतर तपास करत होते. गोरेगाव पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोन आला होता त्याची माहिती काढून तांत्रिक तपास सुरू केला. त्यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकल्याचे तांत्रिक विश्लेषणात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून अंबरनाथ येथून खंडणी मागणारा तेजर शेलार (२६) या तरुणाला अटक केली.

गुंड नव्हे, कंपनीचाच कर्मचारी

पोलिसांना तपासात वेगळीच माहिती मिळाली. आरोपी तेजस शेलार (२६) हा कुठल्याही गुंड टोळीशी संबंधित नव्हता. तो तक्रारदार शहा यांच्याच कंपनीचा कर्मचारी होता. शेलार याला ऑनलाईन मोबाईल खेळाचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्याच्यावर ३ लाखांचे कर्ज झाले होते. शेलार हा शहा यांच्याच गोरेगाव येथील कंपनीतकाम करत होता. त्यामुळे त्याला शहा यांच्याबद्दल त्याला पूर्ण माहिती होती. सध्या लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव गाजत आहे. त्यामुळे त्याचे नाव घेऊन शहा यांना धमकावून पैसे उकळण्याची त्याची योजना होती. मात्र ती फसली आणि शेलार पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

या पथकाने केली कारवाई

गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत खरात, पोलीस निरीक्षक अब्दुल शेख (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक सुविधा पुल्लेलू, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सावले, विजेंद्र काळे, नवनाथ कांगणे आदींच्या पथकाने कारवाई करून आरोपी शेलार याला अटक केली.