लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाकडे दाखल झालेल्या गिरणी कामगारांच्या, त्यांच्या वारसांच्या एक लाख ५० हजार ४८४ अर्जांची छाननी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबई मंडळ आणि कामगार विभाग कामाला लागला आहे. तीन महिन्यात ही छाननी करण्यात येणार असून ती पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हाडा सोडतीच्या धर्तीवर छाननी आणि गिरणी कामगारांच्या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. त्यामुळे आता कामगारांना म्हाडात येण्याची, फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. तसेच सोडतीपूर्वीच कामगार, वारसांची पात्रता निश्चिती होणार आहे. त्यामुळे सोडतीनंतर अवघ्या काही दिवसात कामगारांना घरांचा ताबा मिळणार आहे.
मुंबई मंडळाकडे अंदाजे पावणे दोन लाख कामगार, वारसांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील काही कामगारांना घरे मिळाली असून काहींना ताबा देण्याचे काम सुरु आहे. अजूनही दीड लाख कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना म्हाडाकडे दाखल झालेल्या अर्जांची आधी छाननी व्हावी आणि मग सोडत काढावी असे म्हणत गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अर्जांमध्ये अनेक त्रुटी असल्याने सोडतीनंतर छाननी होण्यासाठी वेळ लागत आहे, त्याचा फायदा भ्रष्ट अधिकारी, दलाल घेत असल्याचे सांगून कल्याणकारी संघाने छाननीची विनंती न्यायालयाकडे केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारने छाननीची मागणी मान्य केली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. आता त्या आदेशानुसार कामगार विभाग आणि मुंबई मंडळ कामाला लागले आहे. एक लाख ५० हजार ४८४ अर्जांची छाननी कामगार विभाग करणार आहे तर त्यासाठीची संगणकीय प्रणाली मुंबई मंडळ तयार करणार आहे अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. नवीन प्रणाली तयार करण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा लवकरच छाननीस सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक, रात्री कर्जत दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल
छाननी, सोडतीपूर्व आणि सोडतीनंतरची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे अर्जदारांकडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे. दरम्यान आता लवकरच मंडळाकडून एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याद्वारे ऑनलाईन छाननी आणि नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देण्यात येणार आहे.
आता कामगार आणि वारसांना आपली सर्व सुधारित (अपडेटेड) कागदपत्रे ऑनलाईन सादर करावी लागणार आहेत. छाननी झाल्यानंतरच सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे सोडतीपूर्वीच पात्रता निश्चिती होणार असल्याने पात्र कामगार, वारसांना सोडतीनंतर लागलीच घराचा ताबा मिळणार आहे. त्यांना म्हाडात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच दलालांच्या जाळ्यात ते अडकणार नाहीत.