लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कंत्राटदारांना कार्यादेश दिल्यानंतर सहा महिन्यांत केवळ ३८ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. तर फेब्रुवारी अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यापैकी १११ रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात पावसाळ्यापर्यंत केवळ ३८ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची कबुली महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. उर्वरित रस्त्यांच्या कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात होऊ शकणार आहे.

येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे आदेश दिले होते. या कामांसाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. तब्बल ६,०७८ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारीमध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. मात्र एप्रिल महिना उजाडला तरी या कामांना बहुतांश ठिकाणी सुरुवात झाली नव्हती. त्यावरून विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यानंतर अखेर ही कामे सुरू झाली. मात्र केवळ ४५ कामे सुरू होऊ शकली होती. त्यापैकी फक्त ३८ कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली आहेत.

आणखी वाचा-मुंबई: महिलेची फसवणूक करून एटीएम केंद्रातून ५० हजार रुपये काढणारी टोळी गजाआड

दरम्यान, शहर भागात रस्त्यांच्या कामांचा वेग अत्यंत कमी असून या भागात एकाही रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला एप्रिल महिन्यात चार कोटी रुपये दंडही करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली. ३९७ किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामांचे कंत्राट तीन वर्षांचे असून ही कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खड्डयाची जबाबदारी कंत्राटदारांची

महानगरपालिका प्रशासनाने जानेवारीमध्ये ३९७ किमी लांबीच्या ९०० हून अधिक रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे कंत्राट दिले होते. नव्याने काम दिलेले हे रस्ते प्रकल्प रस्ते म्हणून महानगरपालिकेच्या परिभाषेत ओळखले जातात. या रस्त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असते. त्यामुळे जानेवारीत काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश दिलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले. या कंत्राटदारांना तसे लेखी कळवण्यात आले आहे. कंत्राटदारांनी या रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.