मुंबई : कबुतरांना खाऊ घालणाऱ्या आणि याप्रकरणी कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तिविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही गेल्या दहा दिवसांत संपूर्ण मुंबईत केवळ तीन प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर गेल्या दहा दिवसात संपूर्ण मुंबईतून ३२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून सध्या मोठा वाद सुरू असून हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या विषयावरून वातावरणही चांगलेच तापले आहे. कबुतरखाना बंद करण्यास जैन समुदायाने आणि पक्षीप्रेमींनी कडाडून विरोध केला आहे. मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ३ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालायने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली होती. तसेच खाद्य देणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिकेच्या पथकाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. गेल्या दहा दिवसांत मुंबई महापालिकेने संपूर्ण मुंबईतून प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर केवळ तीन प्रकरणात पोलीस तक्रार केली आहे.
वर्षभरात ६२ हजार, तर १० दिवसांत ३२ हजार दंड वसुली
कबुतरांना दाणे घालणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्याची तरतूद पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नियमावलीत आहे. गेल्या दीड वर्षात मुंबई महापालिकेने कबुतरांना दाणे घालणाऱ्यांकडून ६२ हजार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर या कारवाईला वेग आला असून गेल्या दहा दिवसांत ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
५१ कबुतरखाने
कबुतरखाने बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते आहे. मात्र अधिवेशनात राज्य सरकारने घोषणा केल्यामुळे या विषयाला वेग आला आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या नियमावलीत आधीपासूनच कबुतरांना दाणे घालणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. मुंबईत एकूण ५१ कबुतरखाने आहेत. तसेच समुद्र किनाऱ्यांवर कबुतरांसाठी धान्य विकत बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढत आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या निवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यांच्या विष्ठेतून व पिसांमुळे श्वसनाचे आजार पसरतात. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे सर्वच कबुतरखाने हटवण्याची मागणी लावून धरली होती.
दादरमध्ये दोन प्रकरणात पोलीस तक्रार
मुंबई महापालिकेने तीन प्रकरणात पोलिसात तक्रार केली आहे. त्यापैकी एक प्रकरण गिरगाव चौपाटीवरील आहे. तर उर्वरित दोन प्रकरणे दादर, माहीम परिसरातील आहेत. मात्र जैन समुदायाने दादरमधील कबुतरखान्यावरील छत फाडून कबुतरांना दाणे घातल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अद्याप पोलिसात तक्रार केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गोरेगावमध्ये सर्वाधिक दंड वसुली
मुंबई महापालिकेने कबतुरांना खाद्य घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सर्वाधिक दंड वसुली गोरेगावमध्ये करण्यात आली आहे. त्याखालोखाल दादर, माहीम, दहिसर, मुलुंड या भागांत कारवाई करण्यात आली आहे.