मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या ‘अ‍ॅन इनकम्प्लिट लाईफ’ या आत्मचरित्राची विक्री आणि वितरण रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.

‘रेमंड’ समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया (८३) यांचा या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया आणि ‘रेमंड’ कंपनीसोबत कायदेशीर वाद सुरू आहे. या आत्मचरित्रातील मजकूर बदनामीकारक असल्याचा दावा करून कं पनी आणि तिचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी २०१९ मध्ये ठाणे सत्र न्यायालय तसेच मुंबईतील दिवाणी न्यायालयात विजयपत सिंघानिया यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. तसेच आत्मचरित्राच्या प्रकाशनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

कंपनीचा दावा काय ?…उच्च न्यायालय आणि ठाणे सत्र न्यायालयाने फेब्रुवारी ते एप्रिल २०१९ दरम्यान विजयपत सिंघानिया यांना त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यासकिं वा प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करणारे अनेक आदेश दिले होते. परंतु विजयपत सिंघानिया आणि प्रकाशकांनी आदेशाचा जाणीवपूर्वक अवमान करून आत्मचरित्र प्रकाशित केले. तसेच ते बाजारात विक्रीसाठी आणले, असा आरोप कंपनीने केला होता. ठाणे सत्र न्यायालयाचे कामकाज दिवाळीच्या सुट्टीमुळे बंद असल्याने थेट उच्च न्यायालयात दाद मागितल्याचेही याचिकेत म्हटले होते.