मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीतील २०१७ पैकी ४६२ विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत. परत करण्यात आलेल्या या घरांसाठी आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ४६२ पैकी ४०६ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई मंडळाने सोमवारी प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, जुहू, पवई, ताडदेव, दादर, विक्रोळी, अँटाप हिल, विक्रोळी आदी ठिकाणच्या २,०३० घरांसाठी ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात आली होती. २,०३० पैकी १३ घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने ८ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात २,०१७ घरांसाठीच सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार २,०१७ घरांसाठी सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर २,०१७ विजेत्यांना स्वीकृती पत्र वितरीत करण्यात आले होते. स्वीकृत पत्राच्या माध्यमातून स्वीकृती दिलेल्या विजेत्यांना देकार पत्र वितरीत करण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर ४६२ विजेत्यांनी घरे परत केली. घरांच्या चढ्या किंमती, उत्पन्न गट आणि किंमतींमधील तफावत, गृहकर्ज उपलब्ध होण्यातील अडचण अशा अनेक कारणांमुळे विजेत्यांनी घरे परत केली आहेत. नियमानुसार परत करण्यात आलेल्या घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाते. त्यानुसार ४६२ पैकी ४०६ घरांसाठी प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना संधी देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा…पंतप्रधान मोदींच्या हत्येचा रचला जात आहे कट, मुंबईत बॉम्बस्फोट होणार… ; वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला संदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी ४०६ घरांसाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार या विजेत्यांना प्रथम सूचना पत्र वितरीत करण्यात आले आहे. आता या विजेत्यांना स्वीकृती पत्र वितरीत करून त्यांची स्वीकृती घेण्यात येणार आहे. स्वीकृती दिलेल्या विजेत्यांना पुढे देकार पत्र पाठवून घराच्या वितरणासंबंधीची कार्यावाही करण्यात येणार आहे. आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान ४६२ पैकी ५६ घरांसाठी प्रतीक्षा यादी नसल्याने ही घरे रिक्त झाली आहेत. प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांकडून किती घरे परत केली जातात हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल. त्यामुळे अर्ज न आल्याने शिल्लक राहिलेली १३ घरे, प्रतीक्षा यादी नसल्याने रिक्त राहिलेली ५६ घरे आणि अंतिमत परत करण्यात आलेली घरे अशी एकूण किती घरे विक्री वाचून रिक्त राहतात हे लवकरच स्पष्ट होईल. तर अंतिमत रिक्त राहिलेली घरे २०२५ च्या सोडतीत समाविष्ट केली जाणार आहेत.